मालेगाव : इयत्ता ५वी ते ९वीच्या शाळा येत्या २७ जानेवारीपासून सुरू होत आहेत. त्याकरिता सर्व शिक्षकांना कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीदम्यान बहुतांश शिक्षकांची कोरोना चाचणी झाली असताना केवळ १५ दिवसांत दुसऱ्यांदा कोरोना चाचणी करण्यात येत असल्यामुळे शासनाला अकारण भुर्दंड सोसावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना कोरोना चाचणी बंधनकारक केली होती. त्या वेळी अनेक शिक्षकांनी कोरोना चाचणी केली. आता २७ जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत. यामुळे शिक्षकांना पुन्हा कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, कोविड सेंटरवर अनेक शिक्षक आणि शिक्षिकांची गर्दी होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारीपूर्वीच शेकडो शिक्षकांची कोरोना चाचणी झाल्यानंतर आता ही प्रक्रिया त्यांना पुन्हा करावी लागत आहे.