कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत नवीन नियमावलीची अंमलबजावणी केली जात आहे. केवळ अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. विनाकारण फिरण्यास मनाई असून, नियमाचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांसह, पालिका प्रशासन वारंवार नागरिकांना करीत आहे. मात्र, नागरिक काहीच देणे-घेणे नसल्यासारखे वागत आहेत. रविवार, ९ मेपासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू होत असल्याने, शनिवारी अनेक वाहनचालक शहरात विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनात आल्याने पोलिसांनी या सर्वांची कोरोना चाचणी करण्याची मोहीम उघडली. त्यामुळे वाहनचालकांची एकच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. वाशिम शहरातील लाखाळा रोडस्थित एका लसीकरण केंद्राकडे जात असल्याचे कारण सांगणाऱ्या काही युवकांची पोलिसांनी चांगलीच कानउघाडणी केली. लस घेण्यासाठी जात असल्याचे कारण सांगितले असता, मोबाइलवरील संदेश दाखवा, अशी विचारणा केली असता, युवकांना संदेश दाखविता आला नाही. दंडात्मक कारवाई, तसेच कोरोना चाचणी करून युवकांना सोडून देण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन कुणीही अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस विभागासह आरोग्य विभागाने केले.
विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:42 AM