.............
पुरेशा प्रमाणात पीपीई किट उपलब्ध
वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात ‘पीपीई किट’ उपलब्ध असल्याची माहिती येथील जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.
.................
शेलूबाजार परिसरात जंतुनाशक फवारणी
शेलूबाजार : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावात सदोदित स्वच्छता राखली जावी, असे आवाहन करण्यात येत आहे. सोबतच शेलूबाजार परिसरात या आठवड्यात ग्रामपंचायतीच्या वतीने जंतुनाशकाची फवारणीही करण्यात आली.
...............
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी
वाशिम : सर्दी, खोकला, ताप, आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, म्हणून वाशिम तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत ग्रामीण भागांत रविवारी रुग्णांची तपासणी करण्यात आली.
..................
हातपंपाची दुरुस्ती करण्याची मागणी
अनसिंग : परिसरातील काही गावांमधील हातपंप मागील अनेक महिन्यांपासून बंद आहेत. ये-जा करणाऱ्या वाटसरूंना हातपंपांवर पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून हातपंप दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
.................
जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या नादुरुस्त
मालेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जवळपास ५६ वर्गखोल्या नादुरुस्त आहेत. दुरुस्तीसाठी शासनाकडून निधीही मिळाला. त्यामुळे या वर्गखोल्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
.................
कोरोना लसीकरण करून घेण्याचे आवाहन
वाशिम : कोरोना संसर्गापासून बचावासाठी असलेल्या दोन्ही लस पूर्णत: सुरक्षित असून, कोणतीही शंका किंवा भीती न बाळगता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.
..............
अतिक्रमणाचे प्रस्ताव नियमानुकूल करा
वाशिम : निवासी अतिक्रमणाचे प्रस्ताव नियमानुकूल नसल्याने अडचणी उद्भवल्या आहेत. हे प्रस्ताव नियमानुकूल करावे, अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा दल या सामाजिक संघटनेने केली.
..............
रस्तानिर्मितीच्या कामाची प्रतीक्षा
वाशिम : बेलखेडा ते पार्डी तिखे (४.५ कि.मी.), येवती ते रिठद २ (कि.मी.) आणि शिरसाळा ते रिठद या २ कि.मी. अंतराच्या रस्तानिर्मितीस मंजुरी मिळाली आहे. हे काम केव्हा सुरू होणार, याची प्रतीक्षा गावकऱ्यांना लागून आहे.
...............
बेघरांना घरकुल देण्याची मागणी
वाशिम : २०११ पूर्वीपासून शासकीय जमिनीवर वास्तव्य करणाऱ्या नोंदी नमुना नंबर ८ ला घेतलेल्या नाहीत. यामुळे अनेक गोरगरीब लोक आजही घरांपासून वंचित आहेत. त्यांना घरकुल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ‘नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस’ने (एनडीएमजे) केली आहे.
.....................
पाण्याचा वापर काटकसरीने करा
वाशिम : मार्च महिन्यानंतर शहरात पाणीटंचाई जाणवण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आतापासूनच नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी केले.
.............
पाणीपुरी विक्रेते सापडले अडचणीत
वाशिम : रस्त्याच्या कडेला गाडा लावून पाणीपुरी विक्री करणाऱ्यांचा व्यवसाय साधारणत: दुपारनंतरच सुरू होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून दुपारनंतर त्याला परवानगी नसल्याने पाणीपुरी विक्रेते अडचणी सापडले आहेत.