लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाकाळात एकीकडे माणुसकीचा परिचय देत समाजातील अनेक सद्गृहस्थ मदतीसाठी पुढे येत आहेत तर दुसरीकडे काहीजण संधी साधत रुग्णांसह नातेवाईकांची आर्थिक लूट करण्यातही मागे-पुढे पाहत नसल्याचे समोर येत आहे. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांकडून विविध प्रकारच्या चाचण्यांचा सल्ला दिला जातो. या चाचण्यांचे दर प्रत्येक पॅथालॉजी लॅबमध्ये वेगवेगळे असल्याने काही ठिकाणी रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचे दिसून येते.वातावरणातील बदलामुळे साथरोग उद्भवत असून सर्दी, ताप, खोकला असल्यास विविध प्रकारच्या चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो. विषाणू संसर्गाचे प्रमाण नेमके किती आहे, याबाबतही काही चाचण्यांचा सल्ला दिला जातो. सीबीसी, सीआरपी, डी-डायमर, एलएफटी, केएफटी आदी स्वरुपांतील चाचण्यांचे दर प्रत्येक पॅथॉलॉजी लॅबमध्ये एकसमान असणे अपेक्षित आहे. बुधवारी चार ते पाच ठिकाणी पाहणी केली असता, या दरामध्ये तफावत असल्याने काही ठिकाणी रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचे दिसून येते. पॅथालॉजी लॅबमध्ये दर्शनीभागात दरपत्रक लावले जात नाही तसेच अधिकृत पावतीदेखील दिली जात नाही. याकडे जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने लक्ष देण्याचा सूर उमटत आहे.
एजंटांची टक्केवारी वेगळीचअधिकाधिक रुग्णांचे चाचणी नमुने तपासणीसाठी मिळावे यासाठी पॅथॉलॉजी लॅब संचालकांमध्येदेखील स्पर्धा असल्याचे पाहावयास मिळते. काही दवाखान्यांच्या परिसरात काही एजंट असून, टक्केवारीच्या मोबदल्यात ते या व्यवसायात जम बसवून असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. एका चाचणीसाठी २० ते ३० टक्के कमिशन असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक चाचणीचे दर वेगवेगळे असल्याचे दिसून येते. एजंटांच्या या टक्केवारीत रुग्ण व नातेवाईकांची मात्र आर्थिक पिळवणूक होत आहे.
नियंत्रणच नाही; लूट सुरूपॅथॉलॅॉजी लॅबमध्ये दरपत्रक नाही, पावती दिली जात नसल्याचे सर्वश्रूत असतानाही आरोग्य विभाग किंवा तालुका, जिल्हा प्रशासनाच्या चमूकडून पाहणी केली जात नसल्याने रुग्ण व नातेवाईकांची लूट सुरू आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन प्रत्येक चाचणीचे दर किती याबाबत दर्शनीभागात दरपत्रक लावण्याचे निर्देश तर रुग्णांची लूट थांबेल, असा सूर उमटत आहे.