- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ १६ जानेवारी रोजी झाला असून, दुस-या टप्प्यात गत १३ दिवसांपासून अन्य शासकीय विभागांतील अधिकारी, कर्मचा-यांना लस दिली जात आहे. लस घेण्यात पोलीस कर्मचारी आघाडीवर असून, नगर परिषद व नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी द्वितीय स्थानी आहेत. देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणा-या कोविशिल्ड लसीचे ११ हजार डोस दुस-या टप्प्यात जिल्ह्यात प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रंटलाइन वर्कर्स यांना कोविशिल्ड लस देण्यात आली. दुस-या टप्प्यात पोलीस, महसूल, नगर परिषद व नगर पंचायतीच्या अधिकारी, कर्मचा-यांना कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. पोलीस विभागातील २१२७, नगर परिषद व नगर पंचायत विभागातील ६३६, महसूल विभागातील ९१० जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट आहे.
आरोग्य अधिकारी, कर्मचा-यांना लसीचा दुसरा डोस पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीपासून जिल्ह्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रांत कार्यरत असलेल्या फ्रंटलाइन वर्कर्स यांना कोविशिल्ड लस देण्यात आली. या अधिकारी, कर्मचा-यांना १४ फेब्रुवारीपासून कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
जि.प. अधिकारी, कर्मचा-यांची नोंदणीजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचा-यांना कोविशिल्ड लस देण्यात येणार असून, सध्या नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ८६० जणांची नोंदणी झाली आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर या अधिकारी, कर्मचा-यांचे पुढील आठवड्यापासून लसीकरण सुरू होईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
दुस-या टप्प्यात महसूल, पोलीस, नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचा-यांना कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. लसीकरणासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचा-यांची नोंदणी सुरू आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचे ११ हजार डोस उपलब्ध झाले असून १४, १५ फेब्रुवारीपासून आरोग्य अधिकारी व कर्मचा-यांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.- डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक वाशिम