कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या कोविशिल्ड लसीचे ६५०० डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. १६ जानेवारीला जिल्ह्यात वाशिम, कारंजा व मंगरूळपीर या तीन केंद्रांत लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. प्रत्येक केंद्रात प्रत्येकी १०० असे एकूण ३०० लाभार्थींना लस देण्याचे नियोजन होते. परंतु, प्रत्यक्षात १६७ जणांनाच लस देण्यात आली. काहीजण नियोजित ठिकाणी हजर होऊ शकले नाहीत, तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्याने लसीकरण मोहिमेत व्यत्यय निर्माण झाला. दरम्यान, रविवार, १७ जानेवारी रोजीदेखील तांत्रिक अडचण दूर झाली नाही. कोविन ॲप आणि अन्य आनलाईन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने १८ जानेवारीपर्यंत लसीकरण मोहीम लांबणीवर पडणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
00
तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने दोन दिवस (दि.१७ व १८ जानेवारी) कोरोना लसीकरण मोहीम थांबविण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी ‘व्हीसी’ होणार आहे.
- डाॅ. मधुकर राठोड
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम