लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर शक्य तितक्या लवकर मात करण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्व नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यामुळे त्या प्रमाणात लस उपलब्ध करणे आवश्यक ठरणार आहे. यावेळी मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणात अडथळा निर्माण होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्स यांना लस देण्यात आली. त्यानंतर पोलीस दलातील कर्मचारी आणि मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात सर्व प्रशासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील विविध आजार जडलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
४५ वर्षांपुढील दोन लाख नागरिकांचे करावे लागणार लसीकरण१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यात या वयोगटातील नागरिकांची संख्या दोन लाखांपेक्षा अधिक आहे. या सर्वांच्या लसीकरणासाठी आरोग्य विभागाला युद्धस्तरावर तयारी करावी लागणार आहे. तेवढा लसींचा साठादेखिल उपलब्ध ठेवावा लागणार आहे.
सध्या जेवढी मागणी तेवढ्या लसी उपलब्ध१४ जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. आरोग्यसेवक, फ्रन्टलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असलेले ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्यासाठी ८८ हजार लस उपलब्ध झाली होती. त्यातील ४० हजारांच्या आसपास शिल्लक आहे. त्यामुळे सध्यातरी लसींचा तुटवडा नाही.
कोरोना लसीकरण मोहीमेत आतापर्यंत तरी कुठलीही अडचण निर्माण झालेली नाही. कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जात आहे; मात्र भीतीपोटी अद्याप त्यास म्हणावा तसा प्रतिसाद संबंधितांकडून लाभत नसल्याचे दिसत आहे. आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार असून आरोग्य विभाग त्यासाठी सज्ज आहे.- डाॅ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम