लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीचा दर बऱ्याच प्रमाणात मंदावला असून, मृत्युदरही ०.२० टक्के टक्क्यांवर कायम असल्याचे जिल्हावासीयांना तूर्तास दिलासा मिळत आहे.जिल्ह्यात मेडशी (ता.मालेगाव) येथे ३ एप्रिल रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. जिल्ह्यात मे महिन्यात पहिला कोरोनाबळी गेला होता. ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची चिंता वाढली होती. सप्टेंबर महिन्यात खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ रुग्णांवर आली होती. एकट्या सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात ६१ जणांचा कोरोनामुळे मत्यू झाला होता. सप्टेंबरच्या तुलनेत गत तीन महिन्यांत जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग बऱ्याच प्रमाणात मंदावला आहे. दुसरीकडे मृत्युदरही ०.२२ टक्क्यांच्या आसपास असल्याने जिल्हावासीयांना तूर्तास दिलासा मिळत आहे. सप्टेंबर महिन्यात मृत्युदर २.३० टक्क्याच्या आसपास होता. ऑक्टोबर महिन्यातही जिल्ह्यात मृत्युसत्र सुरूच होते. या महिन्यात ५३ जणांचा मृत्यू झाला होता. नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनाबळींची संख्या खाली आल्याने जिल्हावासीयांना काही अंशी दिलासा मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे १४८ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, ब्रिटनहून जिल्ह्यात परतलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णामुळे मध्यंतरी चिंता वाढली होती. या रुग्णाच्या संपर्कातील दोन्ही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तसेच ब्रिटनहून परतलेल्या अन्य सहा जणांचे अहवालही निगेटिव्ह आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांची चिंता कमी झाल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असला तरी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी निष्काळजी न राहता आरोग्याची काळजी घ्यावी. सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे आदी लक्षणे दिसून येताच, नागरिकांनी कोरोना चाचणी करावी. तीव्र लक्षणे दिसून येताच रुग्णालयात दाखल होऊन योग्य उपचार घ्यावेत. अंगावर दुखणे काढू नये. कोरोनामुळे फुफ्फुसांवर घातक परिणाम होत असल्याने नागरिकांनी कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. - डॉ. अविनाश आहेर,जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम