लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : परराज्य, परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मे महिन्याअखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ ८ कोरोनाबाधित रुग्ण होते. ३ ते २६ जून या २३ दिवसात ८८ रुग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९६ वर पोहचली. वाशिम शहरातही आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे. दरम्यान, २७ जून रोजी मंगरूळपीर येथील बिलाल नगर परिसरातील एक जण अकोल्यात पॉझिटिव्ह निघाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून सदर परिसर सील करण्यात आला.मे महिन्यापर्यंत अन्य जिल्ह्याच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मर्यादीत होती. जून महिन्याच्या ३ तारखेपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या झपाट्याने वाढल्याचे दिसून येते. दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याने थोडाफार दिलासाही आहे. आतापर्यंत ९६ पैकी ६४ जणांनी कोरोनावर मात केली आहे तर दोघांचा मृत्यू झाला. उर्वरीत ३० जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. २७ जून रोजी जवळपास ४० जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी अकोला पाठविण्यात आले. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी वाशिम येथील महिला अकोल्यात पॉझिटिव्ह आढळली होती. या महिलेच्या संपर्कातील दोन, तीन जणांचे थ्रोट स्वॅब नमुने अकोल्यात तातडीने घ्यावी, यासंदर्भात अकोल्याच्या आरोग्य विभागाशी शनिवारी चर्चा झाली, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.मंगरूळपिरचा एक जण अकोल्यात पॉझिटिव्हमंगरूळपीर शहरातील बिलाल नगर परिसरातील एक जण अकोला येथे उपचारार्थ दाखल होता. या व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल २७ जून रोजी पॉझिटिव्ह आला. खबरदारी म्हणून मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनी बिलाल नगर मंगरुळपीर येथे मनाई हुकूम आदेश लागू केले. २७ जूनपासून पुढील आदेशापर्यंत या प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांना फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
३१ जणांचे स्वॅब घेणारकोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील सहा जणांचे अहवाल २६ जूनला रात्रीदरम्यान पॉझिटिव्ह आले. या सहा जणांच्या ’हाय-रिस्क’ संपर्कात एकूण ३१ जण आल्याची प्राथमिक माहिती आहे. यापैकी २८ जणांना शनिवारी क्वारंटीन केले तर तीन जणांना रविवारी क्वारंटीन केले जाणार आहे. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील एका जणाचा कोरोना चाचणीचा अहवाल शनिवारी अकोल्यात पॉझिटिव्ह आला आहे. पुढील खबरदारीचा उपाय म्हणून मंगरूळपीर येथील त्या भागात आरोग्य विभागातर्फे पुढील १४ दिवस आरोग्य तपासणी व सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्ह्यात एकूण ३० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम