वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट दाराशी येऊन ठेपली आहे. त्याचा सामना करण्यासाठी कोरोना योद्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी २२ हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले; मात्र लस घेण्यासाठी रीतसर नोंदणी होऊनही १० हजार ५४१ कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ४ हजार १६७ जणांनी अद्याप लस घेतलेली नाही. त्यामुळे हे कोरोना योद्धेच असुरक्षित असल्याने ते इतरांना सुरक्षा कशी प्रदान करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
२०२० च्या सुरुवातीला उद्भवलेल्या कोरोना विषाणू संसर्गाने दूरगामी परिणाम केले आहेत. या संसर्गाची दुसरी आणि तुलनेने अधिक तीव्र लाट आता येऊन ठेपली आहे. नजिकच्या अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन आढळत असलेल्या कोरोना रुग्णांची व मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या दिवसागणिक वाढत आहे. वाशिम जिल्ह्यातही कोरोनाने बाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी, समाजातील प्रत्येकाला त्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य, पोलीस, महसूल, नगर परिषदांमधील ‘फ्रंट लाईन वर्कर्स’ म्हणून काम करणाऱ्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन शासन-प्रशासनाकडून केले जात आहे. दरम्यान, कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्यांना आधी सुरक्षा प्रदान करण्यासाठी लसीकरणासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार, शासकीय आरोग्य संस्थांमधील ४१५० आणि खासगी रुग्णालयांमधील १८५८ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद करून त्यांना कोरोना लस देण्याचा कार्यक्रम १६ जानेवारीपासून सुरू झाला. असे असले तरी शासकीय आरोग्य संस्थांमधील १३३८ आणि खासगीमधील १०३७ कर्मचाऱ्यांनी अद्याप लस घेतलेली नाही. यासह पोलीस विभागातील २१२७ पैकी १५९७ कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असून ५३० कर्मचारी अद्याप बाकी आहेत. नगर परिषद व नगर पंचायतींमधील ६३६ कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी निवड झाली त्यातील ४२६ जणांनी लस घेतली असून २१० जण अद्याप लसीपासून दूर आहेत. महसूल विभागातील ९१० पैकी ४०४ कर्मचाऱ्यांचे लसीकरण अद्यापपर्यंत झालेले नाही. यासह खासगी क्षेत्रातील ‘फ्रन्ट लाईन वर्कर्स’ म्हणून नोंद असलेल्या ८६० जणांपैकी २१२ जणांनी लस घेतली असून ६४८ जण अद्यापही लस न घेणाऱ्यांमध्ये समाविष्ट आहेत. संबंधितांना कोरोनापासून बचावाकरिता दोन डोज घ्यावे लागणार आहेत; मात्र ४१६७ जणांनी अद्यापपर्यंत पहिला डोजच घेतला नसल्याने ते दुसरा डोज घेऊन ही प्रक्रिया कशी पूर्ण करणार आणि समाजातील सर्वसामान्य रुग्णांचे कसे रक्षण करणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
........................
बॉक्स :
कोरोना लसीकरणासाठी नोंदीत कर्मचारी व झालेले लसीकरण
आरोग्य कर्मचारी (शासकीय)
उद्दिष्ट - ४१५०, झालेले लसीकरण - २८१२
आरोग्य कर्मचारी (खासगी)
उद्दिष्ट - १८५८, झालेले लसीकरण - ८२१
पोलीस कर्मचारी
उद्दिष्ट - २१२७, झालेले लसीकरण - १५९७
न.प., न.पं. कर्मचारी
उद्दिष्ट - ६३६, झालेले लसीकरण - ४२६
महसूल कर्मचारी
उद्दिष्ट - ९१०, झालेले लसीकरण - ५०६
खासगी क्षेत्र
उद्दिष्ट - ८६०, झालेले लसीकरण - २१२
.............
कोट :
‘फ्रन्ट लाईन वर्कर्स’ म्हणून नोंद असलेल्या कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यानुषंगाने लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. असे असले तरी १० हजार ५४१ पैकी ४ हजार १६७ जणांनी अद्याप लस घेतलेली नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांनी २० फेब्रुवारीपर्यंत लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. इतरांसाठी ही मुदत २८ फेब्रुवारी आहे.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम