लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘अनलॉक-४’च्या टप्प्यात हॉटेल्स्, लॉज पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास २ सप्टेंबरपासून परवानगी मिळाली आहे. सुरूवातीच्या दोन्ही दिवसात हॉटेल्स्मध्ये न जाणेच ग्राहकांनी पसंत केल्याचे जिल्ह्यात दिसून आले. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, नागरिकांनीदेखील सावधगिरीचा पवित्रा घेतल्याचे दिसून येते.साधारणत: मार्च महिन्यापासून देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. तेव्हापासून हॉटेल्स्, लॉज पूर्णत: बंद आहेत. पाच महिन्यांपासून हॉटेल्स् बंद असल्याने व्यावसायिकांचे आर्थिक बजेट कोलमडले. अर्थचक्र सावरण्यासाठी देशात ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू असून, २ सप्टेंबरपासून ‘अनलॉक-४’च्या टप्प्यात हॉटेल्स् व लॉज पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पूर्ण तयारीनिशी हॉटेल्स् व लॉज व्यावसायिक हे ग्राहकांच्या सेवेत सज्ज झाले. दुसरीकडे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकही सावधगिरीचा पवित्रा घेत असल्याचे दिसून येते. भोजनासाठी हॉटेल्सचे दरवाजे खुले झाले असले तरी २ व ३ सप्टेंबर रोजी हॉटेल्समध्ये फारसे ग्राहक गेले नसल्याचे दिसून आले.यासंदर्भात शहरातील हॉटेल व्यावसायिक पंकज गिते, डॉ. दीपक शेळके, जसविंदर सिंग जोहर, पंकज मिनोचा यांच्याशी संपर्क साधला असता, हॉटेल्समध्ये फारसे ग्राहक येत नसल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या दोन दिवसात हॉटेलमध्ये शुकशुकाट दिसून आला.जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९३८ वर गेली आहे. वाशिम शहरातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सावधगिरीचा प्रयत्न म्हणून हॉटेल व लॉजमध्ये जाणे नागरिक टाळत असल्याचे दोन दिवसात दिसून आले. आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाहॉटेल्स, लॉज पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देताना, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार निर्जंतुकीकरण, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन म्हणून काही अंतरावर आसन व्यवस्था करण्यात आली. परंतू, कोरोनाची धास्ती असल्याने सुरूवातीच्या दोन दिवसात हॉटेलमध्ये न जाणे ग्राहकांनी पसंत केल्याचे दिसून आले.
कोरोनाची धास्ती; भोजनासाठी ग्राहक रेस्टॉरंटकडे फिरकेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 12:08 PM