राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लसचे २१ रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या व्हेरियंटग्रस्त रुग्णांनी कुठे प्रवास केला, त्यांचे लसीकरण झाले का, कोरोनाची पुन्हा लागण झाली का? ही माहिती राज्य शासनाकडून गोळा केली जात आहे. कोणताही विषाणू नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलतोे, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचे रूप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषध घेतात, त्यानंतर स्वत:ला वाचण्यासाठी विषाणूकडून रूप बदलले जाते. तसाच प्रकार आता कोरोना विषाणूच्या बाबतीत घडत असून, यावर नियंत्रणासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात आरोग्य विभाग खबरदारी घेत आहे.
------
जिल्ह्यात दररोज दोन हजार टेस्टिंग सुरू
१) जिल्ह्यात संभाव्य तिस-या लाटेचा धोका लक्षात घेत दररोज दोन हजार व्यक्तींची कोरोना चाचणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत चाचण्यांची सुविधा आहे.
-----
२) कोरोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाही खबरदारी म्हणून जिल्ह्यात दरदिवशी दोन हजार व्यक्तींची कोरोना चाचणी केली जात असून, त्यात दरदिवशी सरासरी ३० ते ३५ व्यक्तीच बाधित आढळत आहेत.
-----
३) तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाकडून कोरोना चाचणीबरोबरच लसीकरणालाही वेग दिला असून, प्रत्येक तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे.
-------------
जिल्ह्यात काय खबरदारी
१) कोरोना डेल्टा विषाणूनंतर डेल्टा प्लस चर्चेत आहे. यापासून बचाव करण्यासाठी स्वतंत्र उपाययोजना करण्याची गरज नाही. आतापर्यंत जी खबरदारी आपण घेत होतो, तीच खबरदारी आता घ्यावी लागणार आहे.
-----
२) मास्कचा वापर, हात स्वच्छ ठेवणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. आपण आतापर्यंत वापरत असलेली लस या विषाणूवरही प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे.
-----
३) कोरोना संसर्गाच्या दुस-या लाटेवर नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनाच ‘डेल्टा प्लस’साठी कराव्या लागणार आहेत. त्यात डीसीएससी, डीसीएच, सीसीसीमध्ये बाधितांवर उपचाराची व्यवस्था केली जाणार आहे.
-----
४) कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेमध्ये बालकांना अधिक धोका असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात ७५ खाटांचा एक स्वतंत्र कक्ष, तर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांचा एक स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.
-----