- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘नॉन रेड झोन’मध्ये समावेश झाल्याने २२ मे पासून जिल्ह्यांतर्गत चारही आगारातून बससेवेला प्रारंभ झाला खरा; परंतू, कोरोना विषाणू संसर्गाची धास्ती असल्याने बसमध्ये प्रवास करण्यास प्रवासी धजावत नसल्याचे गत दोन दिवसातील एकंदर परिस्थितीवरून दिसून येते. जिल्ह्यातील चारही आगारातून दोन दिवसात केवळ २५६ प्रवाशांनी बसमधून प्रवास केला.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाने २१ मार्चपासून लालपरीचा चक्काजाम केला. त्यामुळे २१ मार्चपासून राज्यभरातील बसगाड्या आहे तिथेच थांबविण्यात आल्या होत्या. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर, वाशिम, रिसोड या चार आगारांचा समावेश होता. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास सात ते नऊ कोटींचा फटका चारही आगारांना बसला आहे. दरम्यान, वाशिम जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये असल्याने ८ मे पासून काही अटी व शर्तीवर जिल्हा ते तालुका अशी बससेवा सुरू केली होती. परंतू, याला प्रतिसाद लाभला नाही. त्यानंतर राज्यात रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोन झोन पाडून, २२ मे पासून ‘नॉन रेड झोन’मध्ये बऱ्यापैकी शिथिलता मिळाली. जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू झाली असून, चारही आगारात प्रवाशांच्या सोयीसाठी बसेस उभ्या आहेत. परंतू, कोरोना विषाणू संसर्गाची धास्ती असल्याने बसमधून प्रवास करण्यास प्रवाशी धजावत नसल्याचे दिसून येते. परराज्य, परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने मजूर, कामगार येत असून जिल्ह्यातील नागरिक यापासून सावध होत बसमधील प्रवास टाळत असल्याचे दिसून येते. २२ व २३ मे अशा दोन दिवसात वाशिम आगारातून ६०, रिसोड आगारातून १००, मंगरूळपीर आगार १९ आणि कारंजा आगारातून ७७ प्रवाशांनी प्रवास केला. २४ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत चारही आगार मिळून एकूण ४० प्रवाशांनी प्रवास केला. प्रवाशी नसल्याने महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
कारंजा आगार..
गत दोन दिवसात कारंजा आगारातून एकूण २४ फेºया (८०० किमी) सोडण्यात आल्या. एकूण ७७ प्रवाशांनी प्रवास केला असून, प्रवास भाड्यापोटी १८०० रुपये मिळाले. साधारणत: एक किमी अंतरासाठी बसला ४५ रुपये पडतात. कारंजा आगाराला दोन दिवसात एक किमी अंतरामागे २.२५ रुपये मिळाले असून, एक किमीमागे ४३ रुपयाचा तोटा सहन करावा लागला.
रिसोड आगार..
रिसोड आगारातून २२ मे रोजी वाशिम, मालेगाव अशा १२ फेºया झाल्या असून, ४६८० रुपये प्रवासी भाड्यातून मिळाले. २३ मे रोजी वाशिम, मालेगाव अशा १२ फेºया झाल्या असून, ३५०० रुपये प्रवासी भाड्यातून मिळाले. जवळपास १०० प्रवाशांनी प्रवास केला. दररोज तीन बस धावत असून, प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याने आगार तोट्यात असल्याचे आगार व्यवस्थापक श्रीकांत जगताप यांनी सांगितले.वाशिम आगार..
२२ ते २३ मे या दोन दिवसात वाशिम आगारातून तीन ते चार बसफेºया १६० किमी अंतर धावल्या. ६० प्रवाशांनी प्रवास केला. दोन दिवसात प्रवासी भाड्यातून केवळ १२०० रुपये प्राप्त झाले.
मंगरूळपीर आगार..
मंगरूळपीर आगारात एकूण ४१ बसेस आहेत. परंतू, कोरोना विषाणू संसर्गाच्या धास्तीमुळे प्रवासी बसमध्ये बसायला तयार नसल्याने गत दोन दिवसात केवळ मंगरूळपीर ते वाशिम अशा दोन फेºया होत्या. यामध्ये केवळ १९ प्रवाशांनी प्रवास केला.