वाशिम : आॅक्टोबर महिन्यात कोरोनाचा आलेख खालावला असला तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नवरात्रौत्सव व आगामी सण, उत्सवाच्या काळात महिला, नागरिकांनी सतर्क राहून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे, असा सल्ला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया राजोळे यांनी दिला. शनिवारी त्यांच्याशी संवाद साधला असता, त्या बोलत होत्या.
आगामी, सण उत्सव आणि कोरोना याबाबत काय सांगाल?नवरात्रौत्सव हा मुख्यत्वे महिलांचा सण. यात पारंपारिक पद्धतीने नऊ दिवस उपवास व पूजा केली जाते. परंतू, सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या काळात नऊ दिवस कडक उपवास करणे म्हणजे आपली रोगप्रतिकार क्षमता कमी करणे होय. त्यामुळे महिलांनी उपवासाच्या पद्धतीत बदल करून कडक उपवास शक्यतोवर टाळावे. कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे कुठेही गर्दी करू नये, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोणती दक्षता घ्यावी?गर्भवती महिला, मधूमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब व जोखीम गटातील महिला, नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा अधिक धोका संभवतो. सण, उत्सवाच्या कालावधीत धार्मिक स्थळी किंवा मंदिर परिसरात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना महामारीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. नवरात्र व दसºयाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या घरी न जाता सोशल मीडियाचा आधार घ्यावा. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करावे.
सण, उत्सवादरम्यान कोणत्या उपक्रमांवर आरोग्य विभागाचा भर असतो? फिजिकल डिस्टन्सिंग व आवश्यक त्या अटींचे पालन करून कोरोना महामारीच्या काळात आरोग्यविषयक जनजागृती, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे. त्यानुसार दुर्गादेवी मंडळ व महिला मंडळांनीदेखील रक्तदान शिबिर, आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यावर भर द्यावा.