लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात १९ मे रोजी पाच जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एका कोरोनाबाधित रुग्णासोबत मंगरूळपीर येथील २१ जणांनी प्रवास केल्याची बाब समोर आली. खबरदारीचा उपाय म्हणून या २१ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असून, सर्वांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी अकोला पाठविण्यात आले. जिल्ह्यात एकूण २९ संदिग्ध रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. दरम्यान, मालेगाव येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील ४ वर्षीय मुलाचा अहवाल २० मे रोजी निगटिव्ह आला.इतर जिल्ह्याच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी ठेवण्यात जिल्हा प्रशासनासह आरोग्य व पोलीस यंत्रणेने यश मिळविले होते. अलिकडच्या काळात परराज्यातून येणाऱ्या मजूर, कामगारांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची तसेच संदिग्ध रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. मालेगाव येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कातील पाच जण कोरोनाबाधित असल्याचे १९ मे रोजी निष्पन्न झाले. या महिलेच्या संपर्कातील एका मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एका जणाला कोरोनासंसर्ग झाल्याचे १९ मे रोजी स्पष्ट झाले. या रुग्णाच्या संपर्कात मंगरूळपीर येथील तब्बल २१ जण आले आहेत. त्या कोरोनाबाधित रुग्णासोबत प्रवासादरम्यान मंगरूळपीर येथील २१ जण संपर्कात आल्याची खात्री पटल्याने आरोग्य विभागाने १९ मे रोजी सात आणि २० मे रोजी १४ अशा एकूण २१ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून त्यांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आले. या नमुन्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. दरम्यान, या घटनेपासून आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून या २१ जणांच्या संपर्कात अजून कोण कोण आले याची माहिती संकलित करण्याचे काम हाती घेण्यात आले. आर्वी (जि. वर्धा) येथील एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात मंगरूळपीर येथील २१ जण आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना क्वारंटीन केले असून, त्यांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी अकोला पाठविण्यात आले. त्याचा अहवाल सध्या प्रलंबित आहे.- डॉ. अंबादास सोनटक्के,जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम.
रिसोड तालुक्यातही दोन संदिग्ध रुग्ण रिसोड तालुक्यात परजिल्हा, परराज्यातून येणाºया कामगार, मजुरांची संख्या अधिक आहे. या तालुक्यात दोन जण संदिग्ध आढळून आले असून, त्यांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के यांनी सांगितले.