- दादाराव गायकवाड वाशिम: खोकला आणि शिंकण्यातून हवेत पसरणारा कोरोना विषाणू वातानुकूलित वातावरणात जास्त काळ जिवंत राहतो. त्यामुळे ससंर्गाचे प्रमाण वाढण्याची भीती असते. त्यामुळे राज्यभरातील प्रशासकीय कार्यालयात वातानकूलित यंत्रणा, कूलरचा वापर न करण्याचे अथवा गरजेपुरता कमीतकमी करण्याचे आदेश जारी करण्याच्या सुचना राज्याच्या प्रधान सचिवांनी १८ मार्च रोजी अपर सचिव, प्रधान सचिव आणि सर्व मंत्रालयीन सचिवांना दिल्या आहेत. या आदेशाची प्रत विभाग आणि जिल्हास्तरावरील प्रत्येक विभागप्रमुखांना देण्यात आली आहे.कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाकडून आरोग्यविषयक खबरदारी घेण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने श्वसन संस्थेच विकार असलेल्या व्यक्तींशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे, शिंकताना, खोकताना नाकातोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर धरणे, हात वारंवार धुणे, अर्धवट शिजलेले कच्चे मांस न खाणे, फळे, भाज्या स्वच्छ धुवून खाणे आदिंचा समावेश आहे; परंतु या विषाणूपासून होणारा आजार व त्याचा प्रसार मुख्यत्वे बाधित व्यक्तीच्या खोकल्यातून व शिंकण्यातून जे थेंब बाहेर पडतात. त्यातूनच मोठ्या प्रमाणात होत आहे. या आजारात संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहे. कोरोना विषाणूचा अंतर्भाव असलेले शिंकण्यातून आणि खोकल्यातून हवेत उडणारे थेंब हवेतील धुलीकणांसोबत विविध वस्तूंच्या थेंबातील विषाणू जास्त काळ जिवंत राहतात. अर्थात वातानुकूलित किंवा थंड वातावरण या विषाणूच्या संसर्गासाठी पोषक ठरते. या उलट योग्य वायूविजन (व्हेंटिलेशन) किं वा तापमान जास्त असलेल्या वातावरणात शिंकण्या, खोकण्यातून बाहेर पडणारे थेंब लवकर सुकतात त्यामुळे विषाणूचा जीवन कालावधी कमी होऊन रोग प्रसारणास प्रतिबंध होतो. त्यामुळे वातानुकूलित यंत्रणेचा किंवा कूलरचा वापर टाळणे किंवा आवश्यकतेपुरताच कमीतकमी करणे, तसेच दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवून जास्तीतजास्त वायूविजन होऊ देणे हा या विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपाय ठरू शकतो. ही बाब लक्षात घेऊनच राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वातानुकूलित यंत्रणा न वापरणे किंवा या यंत्रणेचा गरजेपुरता कमीतकमी वापर करण्याबाबत सुचना निर्गमित करण्याचे आदेश राज्याच्या प्रधान सचिवांनी १८ मार्च रोजी अपर सचिव, प्रधान सचिव आणि सर्व मंत्रालयीन सचिवांना दिल्या आहेत. या आदेशाची प्रत सर्व विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्यसेवा आयुक्त, आरोग्य संचालक, वैद्यकीय शिक्षण संचालक आदिंना पाठविण्यात आल्या आहेत.
CoronaVirus : कार्यालयातील वातानुकूलित यंत्रणाही आता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 11:24 AM