लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग जगभरात वाढत असून विदेशात असलेले तथा मूळ वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेले आठ जण १६ व १७ मार्च रोजी वाशिम येथे पोहाचले असून, १७ मार्चला या आठही जणांची जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक तपासणी केली. या आठही जणांची प्रकृती ठणठणीत असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बालाजी हरण यांनी दिली.कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असताना देशभरातील आरोग्य यंत्रणा या विषाणूच्या संसर्गावर नियंत्रणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. वाशिम जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागानेही विशेष उपाय योजना आखल्या आहेत. याअंतर्गत विदेशातून वाशिममध्ये येत असलेल्या व्यक्तींवर प्रशासन जातीने लक्ष ठेवत आहे. गेल्या दोन दिवसात विदेशातून वाशिम जिल्ह्यात आठ व्यक्ती परत आले आहेत. या आठही जणांची प्राथमिक तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली. या आठही जणांची प्रकृती चांगली आहे. याशिवाय पुणे व मुंबई येथून १७ मार्चला वाशिम येथे आलेल्या प्रत्येकी एक अशा दोघांची प्रकृतीही ठणठणीत असल्याचे डॉ. हरण यांनी सांगितले.
CoronaVirus : विदेशातून परतलेले आठही जण ठणठणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 2:27 PM