लोकमत न्युज नेटवर्कइंझोरी: मानोरा तालुक्यातील इंझोरी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या उंबर्डा लहान येथील एका कुटूंबातील तिघे हैदराबाद येथून रविवारी रात्री गावी परतले. ग्रामपंचायतने त्यांची चौकशी व तपासणी करून त्यांच्या हातावर होम क्वारंटिनचे शिक्के मारत गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत १४ दिवस थांबण्याचा सल्ला दिला; परंतु सदर कुटूंबाने त्यास नकार देत गावच सोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.इंझोरी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया उंबर्डा लहान येथील पती, पत्नी आणि त्यांचा लहान मुलगा असे तिघे जण हैदराबाद येथे गेले होते. दरम्यान, कोरोना विषाणू ससंर्गावर नियंत्रणासाठी शासनाने देशभरात लॉकडाऊन जारी करीत जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या. त्यामुळे हे कुटुंब हैदराबाद येथेच अडकून पडले होते. अखेर काही दिवसांपूर्वी या कुटुंबाने हैदराबाद सोडून गावाकडे पायी मार्गक्रमण सुरु केले. १०, १५ दिवसांच्या पायी प्रवासानंतर हे कुटुंब रविवारी उंबर्डा येथे पोहोचले. वाशिम जिल्ह्यातही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा सीमाबंदी, लॉकडाऊन, संचारबंदी असतानाच परजिल्ह्यातून पतरणाºया नागरिकांची तपासणी करून त्यांना १४ दिवस होम क्वारंटिनमध्ये ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार इंझोरीच्या सरपंच तथा ग्रामस्तरीय समिती अध्यक्ष कांताबाई हळदे यांच्या सुचनेनुसार हैदराबाद येथून परतलेल्या कुटुंबाची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वारंटिनचे शिक्के मारून त्यांना गावातील जिल्हा परिषद शाळेत १४ दिवस थांबण्याची सुचना केली, तशी नोटीसही ग्रामपंचायतने त्यांना दिली; परंतु सदर कुटुंबाने तेथे थांबण्यास नकार देत गाव सोडल्याचा प्रकार घडला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून, हे कुटुंब आता नेमके कुठे गेले, ते माहिती नसल्याने कोरोना प्रतिंबधासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने या प्रकाराची माहिती पोलीस प्रशासन आणि तहसील कार्यालयासह आरोग्य विभागाला दिली आहे. त्यावरून शोध घेण्यात येत आहे.
CoronaVirus : ‘होम क्वारेंटीन’ कुटूंब गेले गाव सोडून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 11:06 AM