लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव शहर कोरोनामुक्त होत नाही; तोच शहरात ५ जुलैला आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने शहरवासियांची चिंता वाढली. दरम्यान दोन कर्मचारी कोरोनाबाधित निघाल्याने नगर पंचायत कार्यालय सील केले असून, कोरोनाबाधितांच्या संपर्कात किती जण आले, याची माहिती ६ जुलैपासून घेतली जात आहे.एप्रिल, मे व जून महिन्यात मालेगाव शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित काही रुग्ण आढळून आले होते. कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे आता बाजारपेठेत नागरिकांची गर्दी काही प्रमाणात कमी झाल्याचे मंगळवारी दिसून आले. गत आठवड्यात मालेगाव शहर कोरोनामुक्त होते. परंतू, ५ जुलै रोजी दोन जण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये 'आयएलआय'ची लक्षणे असलेले मालेगाव येथील २६ व ३४ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. दोन जण कोरोनाबाधित निघाल्याने नगर पंचायत कार्यालय सील करण्यात आले असून, प्राथमिक टप्प्यात २४ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांनी दिली. मसाला येथेही एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने त्याच्या संपर्कातील तीन जणांचे स्वॅब तपासणीसाठी ६ जुलैला पाठविण्यात आले. मालेगाव शहरातील नगर पंचायत, गीता नगर व गजानन नगर हा एरिया सील केला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये, चेहऱ्यावर नेहमी मास्क किंवा रुमालचा वापर करावा, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले.
कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने मालेगाव नगर पंचायत सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 11:08 AM