वाशिम : कोरोना विषाणूच्या संभाव्य धोक्यापासून सावधगिरीचा उपाय म्हणून अमरावती विभागासह राज्यात सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत १८ मार्चपासून रेशन धान्याचे वितरण आॅफलाईन पद्धतीने करण्यास सुरुवात झाली आहे.सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्याच्या संसर्गाने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्यविषयक आंतरराष्ट्रीय आपत्ती जाहिर केलेली आहे. महाराष्ट्र राज्यातही कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने या आजारास प्रतिबंध व नियंत्रण यासाठी तातडीच्या व आपत्कालिन उपाययोजना राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थींना संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लाभार्थींची बायोमेट्रिक पडताळणी न करताना, ई-पॉस उपकरणावर लाभार्थींच्या बोट, अंगठ्याचे ठसे न घेता रेशन धान्य वितरीत करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने १७ मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या सुचनांच्या अनुषंगाने १८ मार्चपासून वाशिम जिल्ह्यासह राज्यात बायोमेट्रिक पडताळणी न करता लाभार्थींना आॅफलाईन पद्धतीने रेशनच्या धान्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत आॅफलाईन पद्धतीने रेशन धान्याचे वितरण होणार आहे. वरिष्ठांच्या सुचनेनुसार वाशिम जिल्ह्यात लाभार्थींची बायोमेट्रिक पडताळणी न करता रेशन धान्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम.
CoronaVirus : ३१ मार्चपर्यंत रेशन धान्याचे वितरण होणार ऑफलाईन पद्धतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 10:41 AM