लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : ११ जूनपर्यंत कोरोनामुक्त असलेल्या रिसोड शहर व तालुक्यात अलिकडच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये १४ जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार एकूण १२ रुग्णांची भर पडल्याने आता कोरोनाबाधित एकूण रुग्णसंख्या ३० झाली आहे. यामध्ये शहरातील २५ आणि ग्रामीण भागातील पाच रुग्णांचा समावेश आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मार्च, एप्रिल व मे महिन्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बाजारपेठ जवळपास ठप्प होती. मे महिन्याच्या तिसºया आठवड्यापासून विविध प्रकारची दुकाने सुूरू झाली. रिसोड शहरातील जनजीवन पूर्वपदाकडे वाटचाल करीत असतानाच, जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत भर पडत असल्याने शहरवासियांची चिंता वाढली. दरम्यान, रिसोड शहरात पहिला रुग्ण १२ जून रोजी आढळून आला होता. त्यानंतर पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या सर्वांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आता रिसोड शहर कोरोनामुक्त राहिल, असे वाटत असतानाही, जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यात १४ जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार आणखी १० जणांची भर पडली. रिसोड शहरातील १० आणि तालुक्यातील वनोजा येथील दोन अशा एकूण १२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आता शहरातील एकूण रुग्णसंख्या २५ झाली आहे. वनोजा व अंचळ प्रत्येकी दोन आणि भापूर एक असे एकूण पाच रुग्ण ग्रामीण भागात आहेत. हराळ येथील रुग्णाने कोरोनावर मात केली. दरम्यान, मध्यंतरी १४ जून दरम्यान व्यापारी संघटनेने पुढाकार घेत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चार दिवस प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. त्यानंतर बाजारपेठ पूर्ववत झाल्याने नागरिकांची गर्दी वाढली. आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनानेच १५ जुलैपासून सात दिवस लॉकडाऊनचा निर्णय दिला आहे. पहिल्याच दिवशी शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. (शहर प्रतिनिधी)
CoronaVirus : रिसोडकरांची चिंता वाढली; एकूण रुग्णसंख्या ३०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 1:03 PM