लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : परजिल्हा, परराज्यातून १५ ते २३ मे पर्यंत परतलेल्या जवळपास ३२ हजार मजुर, कामगारांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ‘होम क्वारंटीन’ करण्यात आले. ज्यांच्याकडे घरात विलगीकरणासाठी स्वतंत्र जागा नाही, अशा नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये होम क्वारंटीन केले जात आहे. होम क्वारंटीनसाठी जिल्हा परिषदेच्या शाळाही कमी पडत असल्याने अनेकांना शेतात जाऊन ‘होम क्वारंटीन‘ केले जात आहे.जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरत असल्याने विविध कारणास्तव विदेशात, परराज्यात, महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील २७ हजार ५०९ नागरिक पहिल्या टप्प्यात आपापल्या गावी परतले होते. त्यानंतर लॉकडाउनमध्ये जिल्ह्यातील हजारो कामगार, मजूर हे परजिल्ह्यात अडकले होेते. लॉकडाउनमधून सुट मिळाल्यानंतर दररोज शेकडो मजूर, कामगार जिल्ह्यात दाखल होत असून, आरोग्य विभागातर्फे त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. मुंबईवरून आलेल्या कोरोनाबाधित महिलेमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण हे पाच झाले आहेत. त्यामुळे परजिल्हा, परराज्यातून परतणाºया मजुर, कामगारांमुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विशेष दक्षता घेतली जात आहे. महानगरांमधून परतलेल्या ३२ हजार नागरिकांपैकी ३० हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात सुविधा नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ‘होम क्वारंटीन’ केले जात आहे.
शेतामध्ये पर्यायी व्यवस्थापरजिल्ह्यातून परतणाºया मजूर, कामगारांची संख्या वाढत असल्याने होम क्वारंटीनसाठी जिल्हा परिषदेच्या शाळाही कमी पडत आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून ढोरखेडा, गांगलवाडी, मेडशी, केनवड, किन्हीराजा, देपूळ यासह अन्य ग्रामीण भागात शेतात अनेकांना ‘होम क्वारंटीन’ करण्याची वेळ आली आहे.
परराज्य, परजिल्ह्यातून येणाºया मजूर, कामगार, विद्यार्थ्यांमुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आरोग्य विभागातर्फे प्रत्येक मजूर, कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत तपासणी केलेल्या सर्वांची प्रकृती (प्राप्त अहवालावरून) ठणठणीत आहे.- अंबादास सोनटक्केजिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम