लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मंगरूळपीर शहरातील चार, वाशिम शहरातील तीन अशा एकूण सात जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल १ जुलै पॉझिटिव्ह आला. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येने शतक ओलांडत १०३ चा आकडा गाठला. यापैकी दोघांचा मृत्यू तर ७४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत २७ जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. जून महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत गेली. जुलै महिन्यातही पहिल्याच दिवशी सात जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये वाशिम शहरातील ३ व मंगरूळपीर शहरातील चार जणांचा समावेश आहे. वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट परिसरातील २४ वर्षीय महिला, रावले नगर परिसरातील एक व सिव्हिल लाईन्स परिसरातील एक अशा दोन २० वर्षीय युवकांचा समावेश आहे. अल्लाडा प्लॉट परिसरातील महिला यापूर्वीच्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे तर दोन्ही युवक परदेशातून परतले आहेत. बुधवारी दुपारी ११ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी मंगरूळपिरातील चार पॉझिटिव्ह तर उर्वरित ७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. बाधितांमध्ये एकाच कुटुंबातील ३७ वर्षीय पुरुष, ६५ व ३२ वर्षीय महिला व ०७ वर्षीय मुलाचा समावेश आहे. हे सर्वजण बिलाल नगर, मंगरुळपीर येथील असून ते अकोला येथे उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील आहेत.
CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी सात पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १०३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 5:41 PM