लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अकोला येथील प्रयोगशाळेत मोठ्या संख्येने तपासणीसाठी स्वॅब नमुने येत असल्याने ताण वाढला आहे. परिणामी, वाशिम जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांचे स्वॅब आता तपासणीसाठी यवतमाळ येथील प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. दरम्यान, १३ जुलै रोजी जिल्हयात आणखी सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, आता एकूण रुग्णसंख्या २५३ झाली आहे.जिल्ह्यात प्रयोगशाळा नसल्याने सुरूवातीला नागपूर व पुणे येथील प्रयोगशाळेत संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले जात होते. त्यानंतर अकोला येथे सुविधा उपलब्ध झाल्याने नमुने तपासणीसाठी अकोला पाठविले जात होते. अकोला येथील ताण वाढल्याने आता यवतमाळ येथील प्रयोगशाळेत जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत.१३ जुलै रोजी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, आता एकूण रुग्णसंख्या २५३ झाली. यापैकी १३९ रुग्ण अॅक्टिव्ह असून, १०७ जणांनी कोरोनावर मात केली तर सात जणांचा मृत्यू झाला.(प्रतिनिधी)
CoronaVirus : स्वॅब नमुने तपासणीसाठी यवतमाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 10:59 AM