वाशिम : जिल्ह्यात कोरोनामुळे झालेला प्रादुर्भाव लक्षात यावा व त्यादृष्टीने उपाययोजना करण्यास प्रशासनाला मदत व्हावी यासाठी केंद्रीय पथकाच्या शिफारसीनुसार ‘सेरो सर्वेक्षण’ केले जाते. सप्टेंबर महिन्याच्या २० दिवसातच जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात सेरो सर्वेक्षण करावे, असा सूर वैद्यकीय क्षेत्रासह जिल्हावासियांमधून उमटत आहे. तुर्तास जिल्हावासियांना सेरो सर्वेक्षणाची प्रतिक्षा कायम आहे.जिल्ह्यात आतापर्यंत प्रत्यक्ष झालेल्या कोविड चाचण्यांव्यतिरिक्त कोविडचा संसर्ग किती लोकांपर्यंत पोहोचला? किती जणांना कोविडची बाधा होऊन गेली? त्यांच्या शरिरात प्रतिकारशक्ती तयार झाली का? त्यातून समूहाची प्रतिकारशक्ती तयार झाली की नाही? यासंदर्भात ‘सेरो लॉजिकल’ या सर्वेक्षणातून माहिती मिळू शकते. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांचे सहकार्य आवश्यक ठरत आहे. जिल्ह्यात एप्रिल ते आॅगस्ट या चार महिन्यात एकूण रुग्णसंख्या १७५३ होती. सप्टेंबर महिन्यातील २० दिवसातच १८०१ रुग्ण आढळून आले. यावरून रुग्णसंख्या वाढीच्या प्रचंड वेगाचा अंदाज येतो. संभाव्य धोका ओळखून जिल्ह्यात सेरो सर्वेक्षण करण्याची मागणी वैद्यकीय क्षेत्रासह जिल्हावासियांमधून होत आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात अद्याप सेरो सर्वेक्षण सुरू झाले नाही. वरिष्ठांच्या सुचनांनुसार पुढील अंमलबजावणी केली जाईल.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक