लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १८ पैकी ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, ८ जून रोजी परत २० जणांचे स्वॅब तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आले. आता एकूण २७ जणांच्या अहवालाची प्रतिक्षा कायम आहे.जिल्ह्यातील मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. त्यानंतर उत्तरप्रदेशमधील कोरोनाबाधीत ट्रकच्या क्लिनरचा वाशिममध्ये मृत्यू झाला. त्याच ट्रकचा चालक कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले होते. मेडशी येथील एक रुग्ण व ट्रक चालकाने कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. १५ मे रोजी मालेगाव येथील एक महिला कोरोनाबाधित असल्याचे आणि १९ मे रोजी या महिलेच्या संपर्कातील पाच जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यापैकी एका रुग्णाचा २६ मे रोजी मृत्यू झाला तर उर्वरीत पाच रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर वाशी (नवी मुंबई) येथून भोयणी (ता. मानोरा) येथे परतलेली महिला कोरोनाबाधित असल्याचे ३ जून रोजी स्पष्ट झाले. या महिलेच्या संपर्कातील सर्वांचे अहवान निगेटिव्ह आले. दिल्ली येथून दादगाव (ता.कारंजा) येथे परतलेली महिला कोरोनाबाधित असल्याचे ४ जून रोजी स्पष्ट झाले. या महिलेच्या संपर्कातील सर्वांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने दादगाववासियांना दिलासा मिळाला. मध्यप्रदेशातून वाशिम येथे परतलेल्या युवतीला कोरोनासंसर्ग झाल्याचे ३ जूनला सायंकाळी स्पष्ट झाले. या युवतीच्या संपर्कातील काही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, बोराळा येथील रुग्णाच्या संपर्कातील तसेच अन्य आजार असलेल्या अशा एकूण १८ जणांचे नमुने ७ जून रोजी तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी ११ अहवाल निगेटिव्ह आले तर सात अहवालाची प्रतिक्षा आहे. याशिवाय ८ जून रोजी एकूण २० जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आता एकूण चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.