लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सोमवार, २९ जून रोजी प्राप्त १७ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने निगेटिव्ह आले असून, तिघांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, ८१ जणांच्या थ्रोट स्वॅब नमुन्याचे अहवाल प्रतिक्षेत असल्याने थोडीफार धाकधूकही कायम आहे.जून महिन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली असतानाच, दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात एकूण ९६ कोरोनाबाधित रुग्ण असून, यापैकी दोघांचा मृत्यू तर ६७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरीत २७ जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू असून, आता सर्दी, ताप, खोकला, सारी आदी लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांचेदेखील स्वॅब घेण्यात येत आहेत. २७, २८ जून रोजी जवळपास ९८ स्वॅब पाठविण्यात आले होते. २९ जून रोजी १७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ८१ जणांच्या अहवालाची प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान, २९ जून रोजीदेखील तीन जणांनी कोरोनावर मात केली असून, आता २७ जण अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.परराज्य, परजिल्हयातून आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने शहरी भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी मोहिम २१ जूनपासून हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात वाशिम व कारंजा शहरातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून, आतापर्यंत जवळपास ७४ हजारावर नागरिकांची तपासणी झाली आहे. वयोवृद्ध नागरीक, गरोदर स्त्रिया, अतिजोखमीच्या गटातील नागरिकांवर आरोग्य विभागाचा विशेष वॉच असून, बाहेरगावावरून जिल्ह्यात परतणाºया प्रत्येक नागरिकाने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून तपासणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले