लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दोन आठवड्यांपूर्वी दिल्ली येथील धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या मालेगाव तालुक्यातील ५९ वर्षीय एका व्यक्तीचा अहवाल शुक्रवार, ३ एप्रिल रोजी ‘पॉझिटिव्ह’ आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. संभाव्य धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून सदर व्यक्तिच्या कुटुंंबातील आठ जणांना शुक्रवारी सायंकाळी आरोग्य विभागाने वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात हलविले.दोन आठवड्यांपूर्वी दिल्ली येथील धार्मिक संमेलनात हा व्यक्ती सहभागी झाला होता. या पृष्ठभूमीवर संबंधित व्यक्तीला दोन दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्याचे ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीसाठी नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला होता. याचा अहवाल ३ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून, सदर अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामुुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील आठ जणांना वाशिम येथील विलगीकरण कक्षात दाखल केले असून, तपासणी सुरू करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित रूग्णाचे गाव १४ दिवसांसाठी सील करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले.
मालेगाव तालुक्यासह वाशिम शहरात सामसूमवाशिम जिल्ह्यात एका जणाचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याची वार्ता सायंकाळी ४ वाजतादरम्यान जिल्हयात धडकताच मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यात सायंकाळनंतर शुकशुकाट दिसून आला. संबंधित कोरोनाबाधित रूग्णाच्या गावात तर स्मशान शांतता दिसून आली. सदर इसम हा पातूर तालुक्यातील १२ जणांच्या संपर्कात आल्याचीही माहिती असून, त्या १२ जणांची कोरोना चाचणी होईल, असे विश्वसनीय सूत्राने सांगितले.