लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, शतकाकडे वाटचाल सुरू झाल्याचे रुग्ण संख्येवरून दिसून येते. रुग्णसंख्या ८० वर पोहचली असून, ५७ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. गत चार दिवसात आढळून आलेल्या १४ कोरोनाबाधित रुग्णांच्या हाय-रिस्क संपर्कात एकूण ८५ जण आले असून, त्यांचे थ्रोट स्वॅब नमुने घेतले जात आहेत. वाशिम येथील लाखाळा परिसरात २१ जून रोजी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या हाय-रिस्क संपर्कात २६ जण आले. दरम्यान, सोमवारी प्राप्त अहवालानुसार १६ जणांनी कोरोनावर मात केली.जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे एप्रिल महिन्यात आढळला होता. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. परराज्य, परजिल्ह्यातून जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरीक परतत असून, यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. परराज्य, परजिल्ह्यातून परतणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी सरकारी रुग्णालयांत केली जात आहे. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असणाºया संदिग्ध रुग्णांना तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. या संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्याची व्यवस्थाही तालुकास्तरावरच करण्यात आली.जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८० वर पोहचली आहे. वाशिम तालुक्यातील तामसी, लाखाळा व कार्ली असे मिळून एकूण ५९ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत, असे वाशिमचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डावरे यांनी सांगितले. रिसोड व आसेगाव येथील १८ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. २२ जून रोजी जिल्ह्यात एकूण ५६ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली. (प्रतिनिधी)