लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मुंबई येथून नागपूरकडे जाणाºया एक ट्रक क्लिनरचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे त्याच्या थ्रोट स्वॅब नमुन्याच्या ४ मे रोजी प्राप्त अहवालावरून स्पष्ट झाले असून, आता या क्लीनरच्या संपर्कात असलेल्या ट्रकचा ड्रायव्हरही पॉझिटीव्ह असल्याचे शुक्रवारी प्राप्त अहवालावरून स्पष्ट झाले. तथापि, या क्लीनरच्या संपर्कात आलेल्या इतर १० जणाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.मुंबई येथून नागपूरकडे जात असलेला ट्रक १ मे रोजी रात्री पंक्चर झाल्याने वाशिम जिल्हा हद्दीतील कुकसा फाटा (ता. मालेगाव) येथील एका पेट्रोल पंप परिसरात मुक्कामी होता. तेथे ट्रक चालक व क्लिनरने डिझेल सुद्धा भरले. या ट्रकवरील क्लिनरला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने व ताप असल्याने त्याला २ मे रोजी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याचदिवशी उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला. त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आले होते. त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे त्याच्या थ्रोट स्वॅबच्या ४ मे रोजी प्राप्त तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या ड्रायव्हरसह इतर लोकांना तातडीने आयसोलेशन कक्षात दाखल करून त्यांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यात ड्रायव्हरचा अहवाल पॉझिटीव्ह, तर इतर दोघांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्य चिकित्सकांनी स्पष्ट केले.
CoronaVirus in Washim : मृतक ‘क्लीनर’च्या संपर्कातील ‘ड्रायव्हर’ही पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 8:56 PM