मालेगाव/वाशिम : मुंबई येथून परत येणारी मालेगाव येथील महिला कोरोनाबाधित असल्याची बाब १५ मे रोजी रात्री ८ वाजतादरम्यान ‘थ्रोट स्वॅब’ अहवालावरून स्पष्ट झाली. या महिलेसह तिच्या कुटुंबातील सहा जणांनादेखील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्यांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.जिल्ह्यातील मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण आढळला होता. त्यानंतर उत्तरप्रदेशमधील कोरोनाबाधीत ट्रकच्या क्लिनरचा वाशिममध्ये मृत्यू झाला. त्याच ट्रकचा चालक कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, १५ मे रोजी मालेगाव येथील एक महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई येथे कामानिमित्त मालेगाव येथील अनेक कुटुंब गेलेले आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाउन असल्याने उद्योग, धंदे बंद आहेत. परजिल्हा तसेच परराज्यातून स्वजिल्ह्यात येण्यास परवानगी मिळाल्याने अनेक मजूर, कामगार हे वाशिम जिल्ह्यात आपापल्या गावी परतत आहेत.
मालेगाव येथील सात जणांचे एक कुटुंब मुंबई येथे कामानिमित्त गेले होते. या कुटुंबातील एका महिलेला सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे आढळून आल्याने मुंबई येथे उपचार केले. तेथे ‘थ्रोट स्वॅब’ नमुना घेऊन या नमुन्याचा अहवाल मोबाईलवर पाठविला जाईल, असे सांगून या कुटुंबाला मालेगाव येथे जाण्यास सांगितले. १५ मे रोजी मालेगाव येथे परतत असताना, त्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या महिलेसोबत प्रवासात अन्य सहा जणही होते. या सर्वांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून, सहा जणांचे थ्रोट स्वॅब नमुने घेऊन तपासणीसाठी अकोला पाठविण्यात येतील, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी सांगितले.