जनतेसमोर आदर्श: मंगरुळपीर पालिकेचे गटनेते विरेंद्रसिंह ठाकूर यांचा उपक्रम मंगरुळपीर ; तोंडावर आलेल्या पावसाळ्याच्या पृष्ठभूमीवर साफसफाईची कामे करण्याची मागणी शहरातील जनतेकडून जोर धरत असताना मंगरुळपीर येथील नगरसेवक तथा भाजप गटनेते विरेंद्रसिंह ठाकूर यांनी पालिका प्रशासनाच्या तयारीची प्रतिक्षा न करता आपल्या प्रभागात स्वत:च नाली सफाईचे काम करून जनतेसह पालिका कर्मचाऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे. अलिकडच्या काळात सत्तेत असो वा विरोधी बाकावर, लोकप्रतिनिधी केवळ सल्ला देऊन मोकळे होणे आणि सभा बोलावून आपल्या कामांची बतावणी करण्यापलिकडे फारसे काही करण्यात उत्साही नसल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. विरोधात असताना सत्ताधारी गटाच्या धोरणाबाबत आरडाओरड करणे किंवा प्रशासनाच्या चुकांचा पाढा वाचणे, हे प्रकारही पाहायला मिळतात; परंतु अधिकार आणि पदाची दुसरी बाजू कर्तव्य आहे, याचा मात्र लोकप्रतिनिधींना पद्धतशीर विसर पडला असतो. याला काही अपवादही आहेत. त्यामध्ये मंगरुळपीर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा विद्यमान नगरसेवक विरेंद्रसिंह ठाकूर यांचा समावेश आहे. मागील काही दिवसांत मंगरुळपीर शहरातील स्वच्छतेबाबत नागरिकांच्या मानंत प्रचंड निराशा आणि रोषाचे वातावरण आहे. त्यात पावसाळा तोंडावर असताना पालिका प्रशासनाने संभाव्य रोगराईला आवर घालण्यासाठी मान्सूनपूर्व कामे करणे गरजेचे आहे. त्यामध्ये ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिग साफ करणे, नाल्या उपसणे, सांडपाण्याची विल्हेवाट लावणे आणि स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य लाभण्याचे आवाहन करणे, आदिंचा प्रामुख्याने समावेश होतो; परंतु मंगरुळपीर शहरात ३१ मेपर्यंतही त्याला प्रारंभ झाला नसल्याने पालिका प्रशासनासह त्यांनी निवडलेल्या लोकप्रतिनिधींच्या कर्तव्यतत्परतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अशात विरेंद्रसिंह ठाकूर यांनी मान्सूनपूर्व कामे करण्याचा आग्रह पालिका प्रशासनाकडे धरला होता; परंतु त्याला प्रतिसाद लाभत नसल्याने त्यांनी चक्क स्वत:च हाती फावडे घेत नाल्या सफाईचे काम सुरू केले आणि शहराच्या जुन्या वस्तीमधील नाली पूर्ण साफ केली. विरेंद्रसिंह ठाकूर हे स्वत: प्रगतशील शेतकरीही आहेत शिवाय सामाजिकतेची ओढही त्यांना असल्याने त्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर नगरसेवक पदासाठी निवडणूक लढली आणि केवळ उभे राहून इतरांवर ताशेरे ओढण्यापेक्षा स्वत:च स्वच्छतेबाबत पुढाकार घेत तमाम जनतेसमोर आदर्श निर्माण केला.
शहर स्वच्छतेसाठी नगरसेवकाचा पुढाकार
By admin | Published: June 02, 2017 3:39 PM