लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत गावागांवात मतदार यांद्यांचे वाचन करून आक्षेप नोंदविण्यात आले. या आक्षेपानुसार तहसीलस्तरावर दुरुस्ती प्रक्रियाही सुरू करण्यात आली; परंतु यात ‘सर्व्हर डाऊन’ राहण्यासह इतर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. राज्यातील इतरही जिल्ह्यांत हीच समस्या असल्याने मतदार यादीतील आक्षेप आणि तक्रारीनुसार दुरुस्ती करण्यात अडथळे येत आहेत. यामुळे अंतिम मतदार यादी प्रकाशन लांबणीवर पडले असून, येत्या २० जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित होणार आहे.वाशिम जिल्ह्यात मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत १ ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत ३७८५५ नव मतदारांची नोंद केल्यानंतर मतदारांची संख्या ९३८२०२ झाली. नव मतदारांच्या समावेशानंतर निवडणूक विभागाच्यावतीने मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी गावपातळीवर बीएलओमार्फत मतदार यादी वाचन करण्यात प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर नोंदविण्यात आलेले आक्षेप आणि तक्रारीनुसार दुरुस्तीची प्रक्रिया तहसीलस्तरावर राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून, ही प्रक्रिया १० जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करून अंतिम मतदार यादीचे प्रकाशन करण्यात येणार होते; परंतु मतदार यादी वाचनातील आक्षेपांनुसार दुरुस्ती करण्यात येत असताना सर्व्हर डाऊन राहण्यासह इतर तांत्रिक अडचणी वारंवार उद्भवत असल्याने ही प्रक्रिया पूर्ण होण्यात अडथळे आले आहेत. राज्यातील इतरही जिल्ह्यांत अशाच अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रत्यक्षात प्रत्येक मतदाराला निवडणुकीत त्याचा हक्क बजावता यावा आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडली जावी, म्हणून अंतिम मतदार यादी अचूक करण्यावर राज्य निवडणूक आयोगाचा भर असल्याने अंतिम मतदार यादी प्रकाशनाची मुदत आता २० जानेवारी करण्यात आली आहे.
मतदार यादी वाचनातील त्रुटींची दुरस्ती प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 4:56 PM