वाशिम : पुढारी आणि संत या दोन्हींचे लक्ष्य देशसेवा हेच आहे. अनेक राजकीय पुढारी व संत हे देशसेवेचे कार्य अतिशय चांगल्या प्रकारे करीत आहेत तर काही पुढारी हे भ्रष्ट आणि काही संत ढोंगी असल्याने जनतेच्या विश्वासाला तडा जातो, असे प्रतिपादन योगगुरू बाबा रामदेव यांनी केले. स्थानिक दीघे फार्मजवळच्या योगभूमीवर आयोजित योग शिबिराच्या दुसºया दिवशी २८ फेब्रुवारी रोजी ते बोलत होते. दुसºया दिवशीही योग शिबिराला जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
आमदार राजेंद्र पाटणी यांच्या पुढाकाराने पतंजली योग समिती, महिला पतंजली योग समिती, युवा भारत, पतंजली किसान सेवा समिती तसेच भारत स्वाभिमान यांच्यावतीने वाशिम येथे आयोजित योग शिबिरात स्वामी रामदेव बाबा यांनी आरोग्याविषयी मार्गदर्शन केले तसेच योगाचे धडे दिले. योग शिबिराला जनतेचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून वाशिम जिल्हयातील जनता आरोग्याप्रती किती जागरूक आहे हे सिध्द झाले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. योग हेच सर्व आजारावर रामबाण उपचार आहे असे सांगितले. आज राजकारणात काही भ्रष्ट पुढारी तसेच काही ढोंगी संतांमुळे जनतेच्या विश्वासाला तडा जात आहे. हे दोन्ही जन देशाच्या विकासामध्ये मोठा अडथळा आहे. आजही राजकारणात अनेक पुढारी चांगले तसेच संतांमध्येही अनेक संत चांगले कार्य करीत आहेत. देशसेवा हेच त्यांचे लक्ष आहे. देशाचा राजा आज देशाच्या विकासाकरीता झटत असल्याचे सांगितले. प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी योग प्राणायम करणे जरूरी आहे. जीवनात कुठलेही व्यसन करू नका. सत्य बोला, व्यवहार, आचार-विचार शुध्द ठेवा, गोरगरीबांना मदत करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.