वाशिम : सावकाराच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर पेरणी न करण्याची काही महिला व पुरुषांनी सावकाराला धमकी दिली. यावेळी सावकाराचा हृदयविकाराच्या झटक्यात मृत्यू झाला. ही घटना १७ जून रोजी खंडाळा खुर्द येथे घडली असून, ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नऊ जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वाशिम तालुक्यातील खंडाळा खुर्द येथील केशवराव नामदेवराव भोयर यांनी पंधरा वर्षांपूर्वी खंडाळा व अडोळी येथील शेतकर्यांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून शेतजमीन गहान ठेवून घेतली होती. कर्जदार शेतकर्यांनी कर्ज न फेडल्याने सावकार भोयर यांनी शेतजमीन आपल्या नावाने करून त्यावर दरवर्षी पिके घेत असत. सदर प्रकरण सद्य:स्थितीत न्यायप्रविष्ट आहे. असे असताना खंडाळा व अडोळी येथील काही महिला व पुरुषांनी घरी येऊन शेतीमध्ये पेरणी करायची नाही, असे म्हणून शिवीगाळ केली. या धास्तीमुळे भोयर यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. या तक्रारीवरून ठाणेदार विनायक जाधव यांनी नऊ जणांविरुद्ध भादंविचे कलम ३0४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून खंडाळा येथील ओमप्रकाश सावके, संतोष सावके, अडोळी येथील मुकुंदा पडघान व महादू पडघान या चौघांना अटक केली.
नऊ जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
By admin | Published: June 19, 2015 2:56 AM