बांबर्डा कानकिरड : पोषक वातावरण आणि मागील वर्षीचे चांगले दर लक्षात घेऊन बांबर्डा परिसरातील शेतकऱ्यांनी भुईमुगाची पेरणी केली. त्यासाठी एकरी १५ हजार रुपये खर्च केला; परंतु त्यामधून केवळ ९ हजार रुपयेच हाती आल्याने शेतकरी निराश झाले आहेत. रब्बीच्या हंगामानांतर हाती आलेल्या पैशांमधून शेतकऱ्यांनी लोकांची देणी-घेणी करून राहिलेल्या थोड्याफार पैशांत शेतामध्ये उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली. या पिकामधून चांगले उत्पन्न होऊन खरीप हंगामात कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत, या आशेवर शेतकऱ्यांना रात्रंदिवस जागत वन्य प्राण्यांपासून भुईमुगाची जिवापाड राखण केली. बांबर्डा परिसरातील काही शेतमजुरांनी मुलाबाळांच्या पोटाचा खर्च कापून चांगल्या भविष्याच्या आशेने बटईने भुईमुगाची पेरणी केली; परंतु वाढता उष्मा आणि विषम वातावरणाने घात केला आणि उत्पादनात प्रचंड घट आली. अनेक शेतात, तर शेतकऱ्यांच्या हाती भुईमुगाचा पालाच आला. भरीसभर अत्यंत कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना एकरी ८ ते ९ हजार रुपयेच उत्पन्न झाले. त्यामुळे हाती असलेला पैसाही गेल्याने खरिपासाठी आता पैसे आणावे कोठून, हा प्रश्न त्यांना पडला आहे. केवळ बांबर्डाच नव्हे, तर कारंजा तालुक्यातील इतर अनेक गांवातील भुईमूग उत्पादकांची हीच स्थिती आहे.
एकरी खर्च १५ हजार; उत्पन्न ९ हजार
By admin | Published: May 29, 2017 1:14 AM