लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अकोला विभागात ५ केंद्र शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तथापि, गेल्या १२ दिवसांत यातील एकाही केंद्रावर क्विंटलभर कापसाचीही खरेदी होऊ शकली नाही. त्यामुळे कापूस उत्पादकांनी शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ केल्याचे दिसत आहे.केंद्रीय कापूस महामंडळासाठी (सीसीआय) कापूस पणन महासंघ महाराष्ट्र (फेडरेशनने) अकोला विभागात २० नोव्हेंबरपासून कापूस खरेदीसाठी ५ केंद्र सुरु करण्यात आली. यात अकोला जिल्ह्यात तेल्हारा, पारस आणि कानशिवणी, तर वाशिम जिल्ह्यात कारंजा आणि मानोरा येथे सुरू केलेल्या शासकीय खरेदी केंद्राचा समावेश आहे. शासनाच्यावतीने मध्यम धाग्याच्या कापसाला ५१५०, तर लांब धाग्याच्या कापसाला ५४५० रुपये प्रति क्विंटलचे हमीभाव घोषीत केले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या हमीभावात शासनाने ११३० रुपयांची वाढ केली आहे. तथापि, व्यापाऱ्यांकडून कापसाला ५८०० पेक्षा अधिक भाव देण्यात येत असल्याने शेतकरी रोखीने व्यापाºयांकडेच कापूस विकण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे अकोला विभागातील पाचही केंद्रांवर गेल्या १२ दिवसांत एक क्विंटल कापसाचीही खरेदी होऊ शकली नाही. व्यापाºयांकडून मिळणाºया चांगल्या दरासह शासकीय खरेदीतील चुकाºयांना होणारा विलंब यास कारणीभूत असल्याचे दिसत आहे.
शासकीय खरेदी केंद्राकडे कापूस उत्पादकांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 4:44 PM