वाशिम : राष्ट्रीय किसान जागृती अभियानाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या कापूस नीतीचा विरोध करीत गावागावात कापसाची होळी करून आपला निषेध नोंदवला. तालुक्यातील ग्राम कोकलगाव येथे २८ डिसेंबर रोजी कापूस जाळण्यात आला.कापसाची होळी या आंदोलनात परिसरातील शेतकर्यांनी उपस्थित राहून आपले सर्मथन दर्शवले. मागील सरकारच्या काळात देशातील व प्रामुख्याने विदर्भातील कापूस उत्पादकांचे मोठे बेहाल झाले होते. परिणामी देशात व प्रामुख्याने विदर्भात कापूस उत्पादक शेतकर्यांच्या मोठय़ा प्रमाणात आत्महत्याही झाल्या. या शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा समोर करून सत्तेत आलेल्या नवीन सरकारनेही आता जुन्याच सरकारच्या नीती धोरणांचा अवलंब केल्याने पुन्हा एकदा देशातील कापूस उत्पादक संकटात सापडला आहे. यावर्षी पाऊस उशिरा आल्यामुळे पेरणीसही उशीर झाला. त्यामुळे शेतकर्यांचे एकरी उत्पादन घटले अशा परिस्थितीत सध्या कापसाला असलेला अल्पभाव यामुळे एकरी खर्चसुद्धा निघेनासा झाला आहे. त्यामुळे नवीन सरकारनेसुद्धा शेतकर्यांच्या तोंडास पानेच पुसली आहे, अशी सर्वसामान्यांना आता जाणीव झाली असून, नवीन सरकार जुन्याच सरकारच्या वाटेवर धावत असल्यामुळे शेतकर्यांनी ठिकठिकाणी आता नवीन सरकारच्या कापूस नीतीचा विरोध करण्यासाठी कापसांची गावागावात होळी पेटविण्याचे ठरविले आहे. आंदोलनकर्ते जिल्हाधिकार्यांच्या मार्फत केंद्र सरकारला जळलेला कापूस भेट करणार तसेच दिल्लीला जाऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांनाही देणार असल्याचे राष्ट्रीय किसान जागृती अभियानाचे प्रमुख अभिमन्यू भारतीय यांनी दिली. यावेळी अमोल धानोरकर, अभिमन्यू भारतीय, लक्ष्मणराव सोळंके, कैलास गोटे यांच्या नेतृत्वात कापूस जळून केंद्र सरकारच्या कृषीविरोधी धोरणांचा निषेध सर्व कोकलगांववासीयांनी केला.
शेतक-यांनी केली कापसाची होळी
By admin | Published: December 30, 2014 12:41 AM