या कार्यशाळेला महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. डब्ल्यू. के. पोकळे यांचे मार्गदर्शन लाभले. कोविड रूग्ण व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींकरिता रासेयो स्वयंसेवकांची प्रभावी मदतनीसाची भूमिका या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती.
संपूर्ण भारतात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रूग्ण व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींमधील भीती कमी व्हावी आणि या परिस्थितीला सामोरे जाण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये निर्माण व्हावे ही कार्यशाळेची महत्त्वाची उद्दिष्टे होती.
महात्मा गांधी नॅशनल काैन्सिल ऑफ रूरल एज्युकेशन, हैदराबाद, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या प्राध्यापक विकास कार्यक्रम अंतर्गत महाविद्यालयातील रासेयो विभागाने ही कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचे आयोजक वनस्पतीशास्त्र विषयाचे प्रा. डाॅ. सीमित रोकडे व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. एन. लोहिया यांनी कोविड आजार व रूग्ण यांच्याशी निगडित अनेक बाबींवर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
०००
संवाद साधण्याचे कौशल्यावर मार्गदर्शन
कोविड रुग्ण व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींसोबत संवाद साधण्याचे कौशल्य, त्यांना भावनिक व मानसिक आधार, सहानुभूती, त्यांच्याप्रति आदर व सद्भावना, खोटी आश्वासने न देणे, त्यांची गोपनीयता राखून ठेवणे, घरामध्ये अलगीकरण अवस्थेत असलेल्या रूग्णाचे औषधोपचार करताना संसर्ग होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी व त्या रूग्णाबरोबर संवाद करण्याची साधने व कौशल्य, आजार आणि चाचणीबद्दल अचूक माहिती प्रदान करणे, अत्यवस्थ परिस्थितीत असलेल्या रूग्णाला रूग्णालयात घेऊन जात असताना घ्यावयाची खबरदारी, आणि आपण एक मदतनीस किंवा संकट व्यवस्थापक म्हणून काम करत असताना घ्यावयाची स्वतःची काळजी आणि लसीकरणाबद्दल असलेल्या गैरसमजुती व भीतीचे निरसन करून लसीकरण करून घेण्यासाठी प्रोत्साहित करणे इत्यादी बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली.