शेलूबाजार: विवाह तालुक्यात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांत श्रमदानासाठी नवदाम्पत्येही सहभागी होत असून, लाठी, शेंदुरजना मोरेसह विविध गावांत त्यांनी श्रमदान केले.
शेंदुरजना मोरे येथे विवाह बंधनात अडकण्यापूर्वी बंधनाचा सोहळा पार पडल्यानंतर वैवाहिक जीवनाची सुरुवात करण्यापूर्वी नवदाम्पत्याने वॉटर कप स्पर्धेंतर्गत श्रमदान केले, तर मंगरुळपीर तालुक्यातील लाठी येथे रुपाली ज्ञानदेव सुर्वे आणि किशोर बळीराम सोनटक्के यांनी रोपवाटिकेत वृक्ष बिजांचे रोपण करण्याचा आदर्श उपक्रम राबवित पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. वॉटर कपसाठी त्यांनी श्रमदान करून ग्रामस्थांना हातभारही लावला. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत लाठी गावाने सहभाग घेतला असून, या गावात श्रमदानाच्या माध्यमातून जलसंवर्धनाची विविध कामे करण्यात येत आहेत. या कामांमध्ये गावात विवाहबंधनात अडकणारे नवदाम्पत्यही सहभागी होत असल्याने ग्रामस्थांचा उत्साह वाढत आहे. नवदाम्पत्यांना श्रमदानात सहभागी करून घेण्याचा आदर्श उपक्रम लाठी येथे राबविला जात असतानाच या ठिकाणी नवदाम्पत्याने वृक्ष बिजांचे रोपण करून पर्यावरणाचा संदेशही दिला. लाठी येथे ३० एप्रिल रोजी विवाह बंधनात अडकलेल्या रुपाली ज्ञानदेव सुर्वे व किशोर बळीराम सोनटक्के या जोडप्याने रोपवाटिकेत विविध वृक्षांच्या बिजांचे रोपण केले. त्याशिवाय वॉटर कपसाठी श्रमदान करून वैवाहिक जीवनाची सुरवात केली.