मंगरुळपीर : शैक्षणिक संस्थेची बनावट कागदपत्रे व खोटे शिक्के बनवून संस्थेतीलच सभासद, शासन व जनतेची फसवणूक करून लाखो रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी पोलिसांनी ७ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता माजी शिक्षण उपसंचालकांसह १४ जणांवर फसवणुकीसह गंभीर गुन्हे दाखल केले. या घटनेमुळे सर्वत्र चर्चेला पेव फुटले असून, खळबळ उडाली आहे. आरोपींमध्ये माजी शिक्षण उपसंचालक, दोन माजी शिक्षणाधिकारी व एका केंद्रप्रमुखाचा समावेश आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. सावित्रीबाई शिक्षण संस्थेच्या मंगरुळपीर तालुक्यात दोन माध्यमिक शाळा आहेत. या संस्थेत पदभरती तसेच अन्य कामांमध्ये अफरातफर करण्यात आली. सोनखास येथील रामदास आनंदराव डोंगरे यांनी ५ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, माजी शिक्षण उपसंचालक राम पवार, माजी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय तेलगोटे व विश्वास लबडे तसेच सध्या जिल्हा परिषदेत वनोजा येथे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असलेले पांडुरंग जायभाये यांच्यासह मंगला देविदास बुधे, लक्ष्मण परशराम जवके, अनघा शशांक बडगे, तुषार जवके, वासुदेव क्षीरसागर, धम्मपाल मनवर, स्वप्नील काळे, सुमीत कदम, दत्तात्रय क्षिरसागर, अमोल भड यांनी संगनमत करून माध्यमिक शैक्षणिक संस्थेचे खोटे दस्तऐवज आणि खोटे शिक्के बनवून संस्थेचे सभासद, शासन व जनतेची फसवणूक करीत लाखो रुपयांची अफरातफर केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४६६, ४६७, ४६८, ४७१, ४७३, ४८१, ४0९, ४२0, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
फसवणूकप्रकरणी १४ जणांविरुद्ध गुन्हे
By admin | Published: October 08, 2015 1:55 AM