वाशिम (सुनील काकडे) : खोटे दस्तावेज सादर करून सात जणांनी राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेत प्रत्येकी २० हजार रुपये याप्रमाणे १ लाख ४० हजारांचा शासकीय निधी लाटला. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून संबंधित सातही जणांवर मंगरूळपीर पोलिसांत ६ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगरूळपीर तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून शंकर ग्यानबा शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, मंगरूळपीर तहसील कार्यालयाअंतर्गत राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेमध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे सात जणांनी प्रत्येकी २० हजार रुपयांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली. हा प्रकार लोकायुक्तांच्याही निदर्शनास आणून देण्यात आला आहे. याशिवाय जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीतही ही बाब सिद्ध झाली आहे.
त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासह त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्यात यावी, असे तक्रारीत नमूद आहे. त्यावरून पोलिसांनी संबंधित सात जणांवर भादंविचे कलम ४१७, ४२०, ४६४, ४६५, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेंबडे करीत आहे. या घटनेने तहसील कार्यालयात खळबळ माजली असून यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे काय, याचा तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे.