मंगरुळपीर (जि. वाशिम) : वाळूचा अवैध उपसा करून ती विकण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टरमध्ये घेऊन जात असताना मंगरुळपीर पोलीस व महसूल कर्मचार्यांनी शुक्रवारी कारवाई करीत ट्रॅक्टरसह वाळू जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तलाठी दिलीप देशमुख यांनी मंगरुळपीर पोलिसांत फिर्याद दिली की, ३ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजता तालुक्यातील गणेशपूर येथील नदीच्या पात्रातील वाळूचा उपसा करून दोन ट्रॅक्टरचालकांनी ती वाळू विकण्यासाठी चालविल्याची माहिती मिळाल्यानुसार नायब तहसीलदार भोसले तलाठी महामुने, हवालदार राठोड हे घटनास्थळावर दाखल झाले. त्यावेळी नदीच्या पुलावर एमएच-३७, एफ-२९१५, तसेच एमएच-३७, एल-५१८८ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचे चालक भुरान बेनिवाले व कासम गारवे रा. शिवणी रोड हे विनापरवाना वाळू उपसा करून वाहनात भरताना आढळले. त्यावरून पोलीस आणि महसूल कर्मचार्यांनी दोनही ट्रॅक्टरमधील १८ हजार ४00 रुपयांची वाळू व १६ लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर जप्त केले, तसेच आरोपीविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांचाळ करीत आहेत.
वाळूचोरीप्रकरणी दोघांवर गुन्हा
By admin | Published: September 05, 2015 1:40 AM