सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाकडून राज्यभरात पुरविण्यात आलेल्या ३ हजार ९२९ आधार नोंदणी कीट आता महा-ऑनलाईनच्या माध्यमातून यापुढे केवळ महसूल मंडळांतर्गत आणि शहरी भागातील प्रशासकीय कार्यालयांमध्ये कार्यान्वित होणार आहे. अनधिकृत चालविल्या जाणार्या आधार नोंदणी केंद्रांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती सूत्रांनी बुधवार, २७ सप्टेंबरला दिली. राज्यशासनाने २६ जानेवारी २0१७ पासून अनुदानविषयक सर्व योजना ‘ऑनलाईन’ केल्या असून योजनांतर्गत कामांकरिता आधार क्रमांक अनिवार्य केला आहे. असे असताना आजही अनेकांकडे आधार कार्ड नाहीत. बाळ जन्माला येताच त्याच्या आधार क्रमांकाची नोंद घेण्याची देखील सुविधा उपलब्ध नव्हती. ही बाब लक्षात घेवून शासनाने १६ सप्टेंबर २0१७ रोजी महत्वपूर्ण अध्यादेश पारित करून प्रशासकीय यंत्रणांसाठी मार्गदर्शक तत्व जारी केले आहेत. त्यानुसार, यापुढे जिल्हानिहाय महसूली मंडळातील गावे, शहरी भागातील प्रशासकीय कार्यालयांमध्ये आधार नोंदणीची सोय उभी होणार आहे. आधार नोंदणीसाठी महा-ऑनलाईन या संस्थेकडेच जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पश्चिम वर्हाडात २१६ अधिकृत केंद्र राहणार आहेत. वाशिम ५३, अकोला ५८ आणि बुलडाणा जिल्ह्यातील १0५, अशा २१६ केंद्रांना आधार नोंदणीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
आधार नोंदणीसाठी केवळ ‘महा-ऑनलाईन’च मुख्य ‘एनरॉलमेंट एजन्सी’ म्हणून कार्यरत राहणार आहे. त्यानुसार, जिल्हांतर्गत अंमलबजावणी सुरू झाली आहे.- सागर भुतडाजिल्हा समन्वयक, ‘महा-ऑनलाईन’, वाशिम