कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील ५३ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले होते. त्यात मालेगाव तालुक्यातील दहापेक्षा अधिक गावांचा समावेश होता. यासह उर्वरित ७३ गावांमध्येही मोजकेच रुग्ण आढळले होते; मात्र संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होण्यासह मृत्यू होण्याचाही आकडा वाढला. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरासह मालेगाव तालुक्यातही ९ मेपासून कडक निर्बंध लागू केले. तोंडाला मास्क न लावणाऱ्या आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मालेगाव शहरातील बाजारपेठेतील प्रत्येक व्यापाऱ्यांची कोरोना टेस्ट करून घेण्याकडे नगर पंचायतीने विशेष लक्ष पुरविले. यासह ग्रामीण भागातही उपाययोजनांची चोख अंमलबजावणी करण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून, गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. काही गावे पूर्णत: कोरोनामुक्त झाली असून, बहुतांश गावांची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. असे असले तरी कोरोना संकटाचा धोका पूर्णत: टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
........................
२६ मेचा अपवादवगळता मोठा दिलासा
मालेगाव तालुक्यात २४ ते ३० मे या सात दिवसांच्या कालावधीत एकूण २०५ बाधित रुग्ण आढळले. त्यात केवळ २६ मेचा अपवादवगळता दोनअंकी आकडा राहिला. ३० मे रोजी तर केवळ १२ नवे रुग्ण आढळले. या सात दिवसांत बरे होणाऱ्यांचे प्रमाण ३००पेक्षा अधिक असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली.
...................
गत आठवडाभरात आढळलेले रुग्ण
२४ मे - २७
२५ मे - २३
२६ मे - ५६
२७ मे - ३६
२८ मे - २७
२९ मे - २४
३० मे - १२