लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेकांनी कोरोनावर सहज मातही केली. परंतु, कोरोनानंतर रुग्ण, नागरिकांवर म्युकरमायकोसिसचे (बुरशीमुळे होणारा आजार) नवे संकट उभे ठाकले असून, जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालय तसेच इतरही खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असून, जवळपास ९० टक्के रुग्ण हे गृह अलगीकरणात आहेत. कोरोनावर मात केल्यानंतरही बुरशीमुळे होणारा आजार अर्थात म्युकरमायकोसिसचे रुग्ण जिल्ह्यात आढळून येत असल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. मुख, दात, डोळ्यांवर आणि मेंदूवर आघात करणाऱ्या या आजारावर वेळीच उपचार न मिळाल्यास जिवावरही बेतू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. म्युकरमायकोसिसमुळे ११ मे रोजी जिल्ह्यात एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर, या संदर्भात खासगी कोविड व अन्य रुग्णालयांकडून आढावा घेतला असता, जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोरोनातून बरे झालो म्हणून रुग्णांनी काही दिवस तरी स्वत:ची अधिक काळजी घेतली पाहिजे. कोरोनातून सुटलो म्हणजे बचावलो, असे समजून गाफील राहू नका, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी रुग्णांना दिला आहे.
- काय आहे म्युकरमायकोसिस?
हा बुरशीमुळे होणारा आजार आहे. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये हा आजार आढळून येतो. या बुरशीचा संसर्ग नाक, घसा, जबडा, दात यापासून सुरू होऊन डोळे व मेंदूपर्यंत पोहोचून दृष्टीवर परिणाम करू शकतो. काही प्रकरणात तो जिवावरही बेतू शकतो. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे.
.........
काय आहेत म्युकरमायकोसिसची लक्षणे
- गाल, डोळे व दात दुखणे. असह्य डोकेदुखी.
- नाक, टाळूला बुरशीचा काळा चट्टा
- चेहऱ्याच्या हाडाला असह्य वेदना
- डोळा लाल होणे, दृष्टी कमी होणे
- नाकातून रक्त येणे.
.......
- या संसर्गामध्ये काय होते?
ही बुरशी सर्वप्रथम नाका-तोंडातून शरिरात प्रवेश करते. यातून संसर्ग झाल्यानंतर रुग्णाला आधी सर्दी होऊ शकते. नाकाला व घशात सूज येऊन वेदना जाणवू लागतात. ताप व सायनोसायटिससारखा त्रास झाल्यामुळे डोकेदुखी सुरू होते. हिरड्यांवर सूज, पक्के दात अचानक पडणे, गाल बधीर वाटणे अशी लक्षणे सुरुवातीला वाटल्यास नेत्रतज्ज्ञ, नाक, कान, घसा तज्ज्ञ, दंतवैद्यांचा सल्ला घ्यावा. योग्य निदान व उपाययोजना झाल्यास वेळीच या जंतूंचा फैलाव थांबू शकतो. कारण पुढे सायनसमधून जंतू डोळ्यात पोहोचतात. मग डोळे लाल होणे, पाणी येणे, दुखणे, दृष्टी कमी होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. यावेळीसुद्धा उपाययोजना सुरू झाली नाही, तर सूज वाढून डोळे बाहेर आल्यासारखे मोठे दिसू लागतात. डोळ्यांच्या स्नायूंवर सूज येऊन, डोळ्यांची हालचाल कमी होते. त्यामुळे डबल व्हिजनचा त्रास होऊ शकतो. ऑप्टिक नर्व्हला (दिसण्यासाठी मेंदूला जोडणारी नस) जंतूसंसर्ग झाला, तर कायमचे अंधत्व येऊ शकते. पुढे हा संसर्ग डोळ्यांतून मेंदूकडे पसरतो व जिवाला धोका होऊ शकतो.
.....
- हा आजार कुणाला होतो?
मुख्यत: मधुमेही, ज्याच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढले आहे आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण, कोविडनंतर येणारी अशक्ती, बर्न्स, ल्युकेमिया, दीर्घकालीन स्टेरॉईड वापर, अयोग्य पोषण अशा व्यक्तींमध्ये धोका अधिक असतो.
- उपचार :
बुरशीविरोधी औषधे व इंजेक्शन प्रारंभीच्या टप्प्यात उपयोगी आहेत. ही औषधे महाग आहेत. पण, फंगर्सच्या वाढीला रोखू शकतात. प्रसार वाढला, तर शस्त्रक्रिया हाच उपाय उरतो. यात सर्व मृत आणि संक्रमित भाग काढावा लागतो. प्रसार रोखण्यासाठी शरिरातील ज्या भागात संसर्ग झाला आहे, तो भाग काढून टाकावा लागतो.
...
प्रतिबंधासाठी हे करा
- जबडा, दात यांची नियमित स्वच्छता.
- बिटाडिन किंवा गरम पाण्याने गुळण्या.
- वाफ घ्या. यामुळे फंगर्सचा नायनाट होतो.
- मधुमेहावर नियंत्रण ठेवल्यास संसर्गाचा धोका टळतो.
- प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहार, आराम, जीवनसत्त्वांचे सेवन करा
०००००००
कोट
म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. आठवड्यातून किमान दोन रुग्ण उपचारासाठी येत असतात तसेच काही खासगी कोविड हॉस्पिटलमध्येदेखील या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी बोलाविण्यात येते.
- डॉ. स्वीटी गोटे,
नेत्ररोग तज्ज्ञ, वाशिम
०००
पोस्ट कोविडनंतर म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण आढळून आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले तसेच काही रुग्णांना संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांकडे रेफरही करण्यात आले.
- डॉ. प्रवीण ठाकरे, छातीरोग तज्ज्ञ, वाशिम
०००
म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत जवळपास चार रुग्णांना म्युकरमायकोसिस या आजाराची लक्षणे आढळून आली असून, त्यांच्यावर उपचारही करण्यात आले.
- डॉ. सिद्धार्थ देवळे, हृदयरोग तज्ज्ञ, वाशिम
०००००००००००
११ मे रोजी म्युकरमायकोसिस या आजाराने एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर सरकारी रुग्णालयात एकही म्युकरमायकोसिस आजाराचा रुग्ण आढळून आला नाही. खासगी रुग्णालयांकडून माहिती घेण्यात येत आहे.
- डॉ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम.
००००