कारंजालाड : कारंजा ,मानोरा व मंगरुळपीर तालुक्यातील गावांमध्ये मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने आनंदित होऊन परिसरातील बर्याच शेतकर्यांनी कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. पाऊस येईल या आशेत अडकलेल्या बळीराजावर दरवर्षी संकटाचा सामना करावा लागत आहे. मागीलवर्षी झालेल्या अतवृष्टीमुळे संकटात सापडलेला शेतकरी यावर्षी त्याची भरपाई निघेल या आशेने आपल्या शेताची मशागत करून निसर्ग राजाची वाट पाहत होता. मृग नक्षत्र राजाची वाट पाहत होता. मृग नक्षत्र लागताच चौसाळा पारवा मोहगव्हाण,लोहगाव-महागाव व मानोरा परिसरात अवकाळी पण समाधानकारक पाऊस पडल्याने आनंदित होवून शेतकर्यांनी पेरणीची सुरूवात केली. आज ना उद्या पाऊस येईलच या आशेने जवळपास ८0 टक्के पेरण्या आटोपल्या.कमी पावसात पेरणी झाल्याने बियाणे अंकुरले .पण नंतर पाऊस न आल्याने अंकुरलेले कोंब जागच्या जागीच करपून गेले.महागडे बियाणे एकदाच घेणे शेतकर्यांना कठीण असते आता दुबार पेरणी करावयाची वेळ आल्यास कोठून पैसे आणावे असा प्रश्न शेतकर्यांना समोर उभा राहिला आहे.त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेत महसूल विभागामार्फत सर्वे करून तत्काळ दुबारा पेरणीसाठी मदत जाहीर करावी अशी मागणी चौसाळा परिसरातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे. अनेक शेतकर्यांनी सावकाराकडून कर्ज घेतले असून पावसाच्या चिंतेत असलेला शेतकरी पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. पाऊस नसल्याने सर्व प्रकारच्या वस्तू महाग झाल्या असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. अशा शेतकर्यावर दुबार पेरणीचे मोठे संकट उभे झाले आहे. पावसाच्या विलंबामुळे गुराढोरांचा चार्यांचा मोठा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. घरातील साठवलेला चारा संपला आहे. आता कठिण दिवस पाहण्याची पाळी येत आहे. जून महिना संपून जुलैचे आगमन झाले तरी पावसाने दडी मारल्याने सर्व शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाले आहे. शेतकरी सुखी तर मजूरवर्गही सुखी राहतो. पण आज रोजी मजूरवर्ग कामासाठी वनवन भटकत असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी निर्माण झाली आहे. निसर्ग संकटामुळे शेतात पेरलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी शेलू बु. येथील अरुण मस्के, रामदास मस्के व रमेश पवार यांनी तहसीलदारांकडे ४ जुलै रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.पाऊस यावा म्हणून गावागावात धोंडी धोंडीच्या माध्यमातून वरूणराजाची प्रार्थना सुरू केली असून अनेक ठिकाणी देवाजवळ अभिषेक करण्यात येत आहे व प्रार्थना होत आहे.
ठिकठिकाणी दुबार पेरणीचे संकट
By admin | Published: July 06, 2014 7:34 PM