राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल, तसेच शेतकरी अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या खरीप हंगामापासून पूर्वीच्या पीक स्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करून नव्याने स्पर्धा राबविण्यात येत आहे.
पीक स्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेत एकूण ११ पिकांचा समावेश आहे. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी गटासाठी ५ राहील. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या शेतावर त्या पिकाखाली किमान १० आर. क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून, त्यासोबत सातबारा, ८ अचा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावे लागणार आहेत.
०००
पीक स्पर्धा विजेत्यांसाठी बक्षीस
तालुका पातळीवर पहिले बक्षीस ५ हजार रुपये, दुसरे बक्षीस ३ हजार रुपये, तिसरे बक्षीस २ हजार रुपये, जिल्हा पातळीवरील पहिले बक्षीस १० हजार रुपये, दुसरे बक्षीस ७ हजार रुपये, तिसरे बक्षीस ५ हजार रुपये, तर विभाग पातळीवर पहिले बक्षीस २५ हजार रुपये, दुसरे बक्षीस २० हजार रुपये, तिसरे बक्षीस १५ हजार रुपये राहील. राज्य पातळीवर पहिले बक्षीस ५० हजार रुपये, दुसरे बक्षीस ४० हजार रुपये, तिसरे बक्षीस ३० हजार रुपये यांप्रमाणे राहणार आहे.
०००००
कोट
प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा, याकरिता पीक स्पर्धा योजना आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी शेतकऱ्यांना संपर्क साधता येईल.
- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम.