वाशिम: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक नुकसान सर्वेक्षण पूर्णत: नि:शुल्क आहे. त्यासाठी कोणी पैसे मागत असल्यास चुकीचे असून शेतकऱ्यांनी भूलथापांना बळी न पडता सतर्क राहणे आवश्यक आहे. सर्वेक्षणासाठी पैसे मागणाऱ्यांची गय करू नका. वेळप्रसंगी पोलिसांत तक्रार दाखल करा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाभरात जनजागृती मोहीम राबविण्यात येत असल्याचे दिसत आहे.
चालू खरीप हंगामात १ लाख ९८ हजार ५१२ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला आहे. १३ हजार ४५८ शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत पिक नुकसानीबाबत पुर्व सूचना दिली आहे. प्राप्त तक्रारींनुसार, शेतकऱ्यांच्या तक्रारीचे सर्वेक्षण सध्या केले जात आहे. जिल्हयातील सहा तालुक्यांतून शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीच्या सूचना प्राप्त होत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी काही शेतकरी ‘आधी आमचे सर्वेक्षण करा’, असा आग्रह धरत असल्याचे निदर्शनास येत आहे.
दरम्यान, प्राप्त पिक नुकसान सुचनांचे सर्वेक्षण विमा कंपनीचे प्रतिनिधी व कृषि विभागामार्फत पूर्णत: नि:शुल्क स्वरूपात केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही अफवा किंवा भुलथापांना बळी न पडता कोणत्याही व्यक्तीस सर्वेक्षण शुल्क अथवा कुठल्याही कारणास्तव पैसे देवू नये. कोणीही पैशाची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी संबंधित गावचे कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. आवश्यकता भासल्यास नजिकच्या पोलिस स्टेशनला संबंधितांविरुध्द तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी केले आहे.
राज्यातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये पीक नुकसान सर्वेक्षणासाठी येणाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार घडला आहे. या पृष्ठभूमिवर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्णत: नि:शुल्क असल्याने शेतकऱ्यांनी कुणालाही पैसे देवू नये, याबाबत जनजागृती केली जात आहे. - आरीफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम