---------
मजुरांच्या कामाची देयके प्रलंबित
वाशिम : सन २०१९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत शेकडो कामगारांना अद्याप मोबदला मिळाला नाही. शेतकऱ्यांना कुशल कामाची देयके ही अद्याप मिळालेली नाहीत. याची दखल घेण्याची मागणी होत आहे.
----------
ग्रामीण भागांत अनियमित वीजपुरवठा
वाशिम : जिल्ह्यातील इतर काही गावांमध्ये आठवडाभरापासून विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे भाजीपाला पिकांचे सिंचन प्रभावित होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
--------------
वाहनचालकांवर कारवाईचा धडाका
वाशिम : येथून जवळच असलेल्या वाशिम-पुसद मार्गावर जागमाथा फाट्यानजीक पोलिसांनी गुरुवारी वाहनांची कसून तपासणी केली. यात २७ चालकांवर नियमांच्या उल्लंघन प्रकरणी कारवाई करण्यात आली.
----------------
ग्रामीण परिसरात रस्त्यावर सांडपाणी
वाशिम : ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, तर महावितरणकडून अनियमित वीजपुरवठा होत असल्यानेही ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
-----------
रस्त्यावरील गटारामुळे अपघाताची भीती
वाशिम : ग्रामीण रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांत साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना अडचणी येत आहेत. ही कसरत करताना नियंत्रण सुटल्यास अपघात घडण्याची भीती असल्याने या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
-------------------
शेतकऱ्यांना किड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन
वाशिम : खरीप हंगामातील विविध पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कृषी विभाग शेतकऱ्यांच्या दारी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. या अंतर्गत गुरुवारी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी किड नियंत्रण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
---------------
ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
वाशिम : तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी खबरदारी म्हणून तालुका आरोग्य विभागाने गावागावांत ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणीची मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत आठवडाभरात ५०० हून अधिक ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली.